रत्नागिरी, दि. २७ : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधनाच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेतली. या बैठकीत इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रश्न मांडण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
केंद्र व राज्यस्तरावर पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याची बाब ग्राहक पंचायतीने निदर्शनास आणून दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पेट्रोलियम कंपन्यांकडून साठ्याची अचूक माहिती मागवून तातडीने निवेदन देण्याचे आश्वासन दिले.
पेट्रोल पंपांवर उपलब्ध इंधन साठ्याबाबत पारदर्शकता राहावी यासाठी प्रत्येक पंपावर साठ्याचे फलक लावून त्यावर वेळ नमूद करावी आणि दर तीन तासांनी अद्ययावत माहिती प्रदर्शित करावी, अशी आग्रही मागणी ग्राहक पंचायतीने केली. या सूचनेवरही सकारात्मक विचार करण्याचे संकेत प्रशासनाने दिले.
दरम्यान, शासनाकडून मोठ्या अनुदानावर वितरित करण्यात आलेल्या यांत्रिक शेती उपकरणांसाठी इंधनाची गरज असल्याने शेतकऱ्यांना अखंड इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही मागणी पूर्ण करणे अवघड असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तरीही कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता ग्राहक पंचायतीने अधोरेखित केली.
गॅस वितरण व्यवस्थेबाबतही गंभीर समस्या मांडण्यात आल्या. ऑनलाईन नोंदणी करूनही ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने त्यांना स्वतःच भरलेले सिलिंडर वाहून नेण्यास भाग पडत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब बैठकीत सांगण्यात आली. तसेच घरपोच वितरणासाठी आकारले जाणारे शुल्क परत मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत गॅस सिलिंडर सुरक्षितपणे घरपोच देण्याबाबत आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
रत्नागिरीत सुरू असलेल्या गॅस पाइपलाइन प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. काही भागांत पाइपलाइन टाकूनही प्रत्यक्ष कनेक्शन देण्यात आलेले नाहीत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीकडून माहिती घेत नव्या ठेकेदाराची नियुक्ती करून गॅस जोडण्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीनंतर ग्राहक पंचायत अध्यक्ष संजय वैशंपायन, शेतकरी प्रतिनिधी अनंत भडकमकर आणि सदस्य संतोष गाडगीळ यांनी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले. ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्राहक पंचायत सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांनी आपल्या अडचणी संघटनेकडे मांडाव्यात, असे आवाहन सदस्य दीपक राऊत यांनी केले आहे.








