मुंबई, दि. २७ : अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वादात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षातील पदही सोडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अशोक खरातवर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. खरातसोबतचे रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. चाकणकर या खरात यांना गुरू मानत असल्याच्या चर्चेमुळे हा वाद अधिकच वाढला. परिणामी, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केवळ विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर राष्ट्रवादीतील काही गटांकडूनही होत होती.
या सर्व घडामोडींनंतर चाकणकर यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देत निष्पक्ष चौकशीसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. “खरात प्रकरणाबाबत मी पहिल्याच दिवशी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी किंवा गैरकृत्याशी माझा थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तपासादरम्यान सत्य समोर येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांमधून होत असलेले आरोप निराधार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘शिवनिका’ ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या संचालिका असल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या ट्रस्टशी संबंधित सर्वांची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्पष्ट इशारा देत, “अशोक खरातशी संबंधित कोणताही व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही,” असे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात येत्या काळात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जागी कोणाला जबाबदारी दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होणार, याबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.
सध्या तरी चाकणकर यांनी राजीनामा देत चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली असली, तरी या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.








