Ganpatipule : आरे-वारे समुद्रात दुर्दैवी घटना; दोन पर्यटक बुडाले, एकाचा मृत्यू

रत्नागिरी, दि. २९ : जिल्ह्यातील निसर्गरम्य आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन पर्यटक समुद्रात बुडाल्याने एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब पर्यटनासाठी रत्नागिरीत आले होते. रविवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघे समुद्रात उतरले. सुरुवातीला पाणी शांत असल्याचे भासले, मात्र काही क्षणांतच ओहोटीच्या तीव्र प्रवाहामुळे दोघेही खोल पाण्याकडे ओढले गेले आणि बुडू लागले.

किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी ही घटना पाहताच तातडीने धाव घेतली. पोलीस पाटील आदेश कदम आणि इतर ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उतरून बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला बाहेर काढण्यात यश आले. त्याची प्रकृती बिघडलेली असल्याने त्याला तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा शोध घेऊन बाहेर काढल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाय किंवा इशारे नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलीस प्रशासनाने पर्यटकांना विशेषतः ओहोटीच्या वेळी समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अपरिचित किनाऱ्यांवर खोल पाण्यात जाणे टाळावे, स्थानिकांचा सल्ला घ्यावा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा