साखरपा येथे प्रवासी ट्रॅव्हल्सला भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले

साखरपा (सांगमेश्वर), दि. ०३ : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात पहाटेच्या सुमारास प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीत असलेले सर्व ३० प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) यांच्या ताब्यातील एनएल ०१ बी २४४२ क्रमांकाची प्रवासी ट्रॅव्हल्स पुणे येथून सायंकाळी सहाच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे रवाना झाली होती. ही गाडी पहाटे अंदाजे ३.३० वाजण्याच्या सुमारास साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर पोहोचली असता चालकाच्या निदर्शनास अचानक वाहनातून धूर निघत असल्याचे आले. काही क्षणांतच धुराचे प्रमाण वाढले आणि लगेचच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गाडी वेढून टाकली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने विलंब न करता तात्काळ सर्व प्रवाशांना खाली उतरवले. अंधाराच्या वेळी आणि धोकादायक परिस्थितीतही चालकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. प्रवाशांमध्ये महिलां व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनातील विद्युत यंत्रणेमधील बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्णतः जळून खाक झाली होती. या आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानाची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर तसेच स्थानिक चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली. तसेच प्रवाशांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली.

या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटेच्या शांततेत अचानक लागलेल्या आगीमुळे स्थानिक नागरिकही घटनास्थळी जमा झाले होते. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने परिस्थिती हाताळत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.

या प्रकारामुळे प्रवासी वाहतुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनांची नियमित तपासणी, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

आणखी वाचा