रत्नागिरी, दि. ०६ : प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचा मोठा घोळ उघडकीस आला असून, कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. प्रमोद महाजन क्रीडांगणावर सायंकाळी ७ वाजता होणारा हा कार्यक्रम प्रत्यक्षात आयोजितच न झाल्याने राज्यभरातून आलेल्या शेकडो रसिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
हा कार्यक्रम एकदंत थिएटर्स आणि ताल क्रिएशन्स (ताल एंटरटेनमेंट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तिकीट विक्री स्थानिक पातळीवर तसेच ऑनलाइन ‘बुक माय शो’वर सुरू होती. पुणे, कोल्हापूर, सांगली, मुंबई आदी भागांतून अनेक रसिकांनी ५०० ते ३५०० रुपयांपर्यंतची तिकिटे खरेदी केली होती. सुमारे १५०० प्रेक्षकांच्या क्षमतेचा हा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, कार्यक्रमाच्या दिवशी संध्याकाळी प्रमोद महाजन क्रीडांगणावर पोहोचलेल्या प्रेक्षकांना धक्काच बसला. ठिकाणी ना स्टेज, ना खुर्च्या, ना कोणतीही तयारी — तसेच आयोजकही गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आयोजक गंधार जोग आणि दिवेश बापट यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम पाच दिवस आधीच रद्द झाल्याची माहिती ‘बुक माय शो’ला देण्यात आली होती. मात्र, ‘बुक माय शो’कडून अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत असून, कार्यक्रमाच्या दिवशीही तिकीट विक्री सुरू होती. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे अनेक प्रेक्षकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. कोल्हापूरहून आलेल्या वैशाली कोळी यांनी सांगितले की, “आम्ही खास गाडी करून रत्नागिरीत आलो, हॉटेल बुक केले. ३५०० रुपयांचे तिकीट घेतले होते. पण येथे आल्यावर कार्यक्रमच नाही हे समजले. आयोजकांकडून कोणतीही माहिती दिली नाही. आमची फसवणूक झाली असून, कारवाई व्हावी व पैसे परत मिळावेत.”
मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून आलेल्या अनेक प्रेक्षकांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. “महेश काळे यांच्यासारख्या प्रतिष्ठित गायकाच्या कार्यक्रमाबाबत असा गलथानपणा होणे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया अमृता काळे यांनी दिली.
स्थानिक नागरिकांच्या मते, कार्यक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारीच दिसत नव्हती. मोठा कार्यक्रम असल्यास स्टेज, रोषणाई, पोलीस बंदोबस्त यांची व्यवस्था दिसली असती; मात्र प्रत्यक्षात काहीच तयारी नसल्याने संशय अधिक बळावला.
दरम्यान, या प्रकरणी संतप्त प्रेक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला असून, आयोजक व संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तिकीटाचे पैसे व इतर खर्चाची भरपाई मिळावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
एकूणच, या प्रकारामुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कारवाईची गरज व्यक्त होत आहे.








