शेती आणि शेतकऱ्यांचे जाणकार : महात्मा फुले

भारतात अगदी प्राचीन काळापासून शेती हा व्यवसाय सुरू आहे. अगदी नदीकाठी राहणाऱ्या माणसापासून ते आजच्या अत्याधुनिक अत्याधुनिक काळातील मानवापर्यंत भारतामध्ये ६४% पेक्षा जास्त लोक शेती करत असतात. भारताचा सर्वात मोठा व्यापार हा शेतीवर आधारित व्यवसायांवर अवलंबून आहे. ज्या प्रकारे शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून भारताची आर्थिक जडणघडण घडून येते, त्याच प्रकारे भारताची उलाढाल सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. काळाच्या ओघांमध्ये याच शेतीचा उत्पन्नाच्या जोरावर भारताने खूप मोठी प्रगती केली होती, मात्र इंग्रजाच्या काळात तत्कालीन व्यवस्थेमुळे भारतातील शेतीकडे दुर्लक्ष व्हायला मदत झाली.

एका बाजूला वाढणारी लोकसंख्या तर दुसऱ्या बाजूला शेतीचे होणारे विभाजन. यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न खुप कमी झाले. हे सर्व घडून येत असताना जगाच्या तुलनेमध्ये भारताकडे मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र असतानाही, इंग्रजांनी लादलेल्या निर्बंधामुळे आणि उत्पादित होणाऱ्या कमी मालामुळे शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष होण्यास सुरुवात झाली. याचा प्रत्यक्ष परिणाम शेतीवर झाला. परिणामी शेतकरी वर्गावर झाला.

अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी या सर्व विषयांवर आवाज उठवत इंग्रज सरकारला शेतीवर लादलेल्या निर्बंधाबद्दल प्रश्न विचारले. कारण त्यांना माहिती होते की, जोपर्यंत आपल्या देशातील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या शेती क्षेत्राची प्रगती होत नाही, तोपर्यंत देशांमध्ये आर्थिक विकास साधला जाणार नाही आणि लोक सक्षम बनणार नाहीत. म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या समोर सुद्धा शेतकऱ्याचा जाहीरनामा वाचला होता. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे थोर विचारवंत आणि वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असलेले तत्कालीन व्यवस्थेमधील एक महत्त्वाचे नेते होते.

भारतामध्ये प्रदीर्घ काळ शेतीच्या आणि शेतीवर आधारित उद्योगामुळे भारतात सोन्याचा धूर निघत होता. त्या भारतामध्ये इंग्रजासारख्या मुठभर लोकांच्या देशाने सत्ता गाजवावी आणि देशातील सर्वांनी ती उघड्या डोळ्यांनी बघावी, या मागच्या कारणाची चिकित्सा केली. ती चिकित्सा करत असताना त्यांना शिक्षणाचा अभाव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अज्ञान यासह अनेक प्रथा – परंपरा सापडल्या. त्यामधील त्यांनी सगळ्यात महत्त्वाच्या भाग म्हणजे शिक्षणावर दिला आणि याच शिक्षणातून लोकांना प्रशिक्षित करत खऱ्या अर्थाने परदेशी देशांमधील अनेक बाबी त्यांनी आपल्या लोकांच्या मनावर बिंबविल्या आणि त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात येणारे बदल हे अत्याधुनिक स्वरूपातील साधनांच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाल्यास शेतकरी हे खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सुखी होतील हा सिद्धांत त्यावेळी त्यांनी हंटर कमिशन समोर मांडला.

अतिशय धाडसी, अभ्यासू आणि चिकित्सक स्वभावाचे महात्मा ज्योतिबा फुले असल्याने त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला इंग्रज सरकारला उत्तर देता आलेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने कैवारी त्यावेळच्या काळामध्ये जर कोण असतील तर ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे होते. त्याकाळातच नव्हे तर आजही त्यांच्या अनेक गोष्टी ह्या आपल्या देशातील शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांबाबत शेतकऱ्यांबाबत सत्य असल्याचे आपल्याला जाणवते. म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये भारतातील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांना शिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली होती. हे सगळं होत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पाश्चात्य देशातील अनेक विचारवंतांच्या आधुनिक विचारांचा पगडा पडायला सुरुवात झाली. तोच आधुनिक विचार महात्मा ज्योतिबा फुले भारतातील व्यवस्थेत शोधत होते. मात्र त्यांना या देशातील रुढीग्रस्त परंपरामुळे उत्तर सापडले नाही.

म्हणून त्यांनी या अन्यायी प्रथा, परंपरा यांच्या विरोधात उभे राहून काम करायला सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देत त्यावर काम सुरू केले. शिक्षणासोबतच त्यांचं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोलाचे योगदान आहे
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि तो जगात अग्रेसर होण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केल्याचे दिसून येतात.

त्यांनी इंग्रज सरकारकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. मुळात तेच स्वतः एक प्रगतशील शेतकरी होते. त्यामुळेच त्यांना शेतीतील अडचणी, समस्या कोणत्या आहेत याची जाणीव होती, त्यासोबतच त्यावर कोणते उपाय आहेत हेही त्यांनी सांगितले.

त्यांनी शेती, शेतकरी आणि शेती व्यवस्था यांच्या विकासासाठी पुढील मागण्या इंग्रज सरकार केल्या असल्याचे सापडते….
१. शेतीमालाला उत्पादनखर्च भरून येईल आणि किमान १५ ते २० टक्के नफा मिळेल एवढा बाजारभाव मिळाला पाहिजे,
२. शेतकर्‍यांना पिकांसाठी पुरेसे आणि बारमाही पाणी सिंचनासाठी मिळाले पाहिजे, ते वाया जाऊ नये म्हणून नळाद्वारे देण्यात यावे.
३. आधुनिक पद्धतीच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारने परदेशात पाठवावे.
४. शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
५. शेतीला समृद्ध करायचे असेल आणि शेतकरी सुखी करायचा असेल तर शेतीच्या जवळ धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत. जेणेकरून त्याचा फायदा हा शेतकरी वर्गाला होऊन देशाला समृद्धता लाभेल. जोपर्यंत कायमस्वरूपी सिंचन सुविधा शेतकऱ्यांना मिळणार नाही, तोपर्यंत देशातील शेती क्षेत्राला न्याय मिळणार नाही असा ते स्पष्ट इशारा देतात.
६. शेतकऱ्यांने आपल्या शेतीत उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत. जेणेकरून त्याच्या शेतीत उत्पादन वाढेल आणि त्याला स्थैर्यता लाभेल.
७. जोपर्यंत शेतकरी आधुनिक पद्धतीची शेती करणार नाही, तोपर्यंत शेतीचा दर्जा चांगला होणार नाही. आणि या आधुनिकतेच्या जगात तलाव, तळी,धरणे बांधून शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता. पावसाच्या पाण्यावर शेती करायची असल्यास हाती फक्त नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
८. म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. शेतीत तर्क माल पिकवत असताना, त्या मालाला योग्य भाव न मिळाल्यास त्याचे कष्ट फुकट जातील. म्हणून त्याच्या योग्य दराचा विचार होणे आवश्यक आहे, त्यासोबतच त्याने जोड धंदा सुरू केला पाहिजे.

अशा अनेक गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी आपल्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात सन १८८३ साली मांडल्या होत्या आणि प्रत्येक वेळी समाजासमोर मांडल्या. एवढेच नव्हे तर आपल्या अभ्यासपूरण वैचारिक मांडणीतून त्यांनी इंग्रजांनाही प्रश्न विचारले. हंटर कमिशनसमोरही ते शेतकऱ्यांच्या वेशात पोहचून त्यांनाही शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव करून दिली.

आज भारतात अनेक ठिकाणी शेतातील पिकाना हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी उग्र आंदोलने होत आहेत. तरीही त्यांना हमीभावाच्या मागणीला यश येत नाही. किंवा सरकार द्यायला तयार नाही. अशावेळी आजपासून १५० वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हमीभावाचा विचार मांडला होता. अत्यंत दूरदृष्टीने हा विचार मांडून भारतात येणाऱ्या संकटाची जाणीव सरकारला करून दिली होती. जर शेतीला हमीभाव मिळाला नाही आणि शेतकऱ्यांनी जोड धंद्याचा स्वीकार केला नाही, तर भारतात शेतकरी आणि शेती अडचणीत येणार असल्याचे सांगितले होते. आज जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकविलेल्या त्याच्या शेतातील सोन्याला भाव कवडीमोल मिळत आहे. सगळीकडे INDUSTRILIZATION होत असताना शेतीकडे आणि देशाच्या पोशिंद्या शेतकऱ्याकडे होणारे दुर्लक्ष गंभीर आहे. असेच दुर्लक्ष इंग्रज सरकारने केले म्हणून इंग्रज सरकारला धारेवर धरणारे महात्मा फुले आज हवे होते.
त्यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार सरकारने आणि शेतकऱ्यांनी देखील आत्मसात करणे काळाची गरज आहे.

– श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाट खंडाळा, ता. जि. रत्नागिरी.
संपर्क – ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४.

आणखी वाचा