डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा ‘.हा मूलमंत्र बहुजन समाजाला दिला. शिकलेला माणूस आपल्यावर अन्याय सहन करु शकत नाही. गुलामगिरीच्या विरोधात तो बोलू लागतो आणि लिहू लागतो. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये सारासार विचार करण्याची शक्ती निर्माण होते. अशिक्षित माणसाला दारिद्र्य, अशिक्षित आणि अंधश्रध्दा यांच्या खाईत नेउन लोटतो . त्यावेळच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे दलित आणि बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला. त्यावेळच्या उच्चवर्णियानी ह्या समाजाला किड्यामुंग्यांचे जीवन जगण्यास भाग पाडेल . आपल्या स्वार्थासाठी दलित व बहुजन समाजाला अशिक्षित ठेवण्याचे मोठे कारस्थान त्यावेळी केले होते.
म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले शिक्षणाचे महत्व सांगताना म्हणतात,
” शूद्रांना सांगण्या जोगा आहे एकच मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा”
तर क्रांतीसूर्य म. जोतीराव फुले म्हणतात, ” शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. ” पण आपले आयुष्य पूर्णपणे अशिक्षितपणात घालविलेल्या गाडगे महाराज या महापुरुषाने शिक्षणाचा अर्थ फारच सोप्या शब्दांत सांगितला आहे, ” शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ धोंडा “. पुढे जाऊन ते म्हणतात, ” शिक्षण ही आजची गरज आहे, वेळ आली तर उपाशी राहा, पण मुलाबाळाना शिकवा. शिकेल व शिकविल तोच खरा मोठा” .
डॉ. बाबासाहेबांवर ह्या तिन्ही महान विभूतींनी मोठा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेबांच्या मते शिक्षण हे माणसाला घडवित असते. शिक्षण म्हणजे विद्या आणि प्रज्ञा यांचा सुरेख संगम. शील घडविते तेच खरे शिक्षण. शिक्षणाशिवाय उत्तम चारित्र्याची निर्मिती होवू शकत नाही. आपल्या जीवनात नैतिक मुल्यांची जपणूक झाली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळची स्थिती माहित होते म्हणून ते म्हणतात, “हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण हे चूक आहे. कारण हिंदुस्तानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्चवर्गाची सेवा करण्यास भाग पाडणे नव्हे. खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे, हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे.’ तात्पर्य बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता.
डॉ . बाबासाहेबांनी नवमानवतावादाचा संस्कार करणारे शिक्षण हवं होतं . जात- धर्म – वर्ण यांना नष्ट करणारे शैक्षणिक विचारांची बाजू त्यांनी उचलून धरली. ” स्वातंत्र्य , समता आणि बंधुता ” या मुल्यांचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांची लोकशाहीवर अतोनात निष्ठा होती. सुदृढ लोकशाहीत सुशिक्षित समाजाची अत्यंत गरज आहे. त्यांच्या मते , लोकशाही यशस्वी करायची असेल तर जनता किंवा समाज नैतिक मुल्याधिष्ठित शिक्षणाव्दारे संस्कारित असावा. लोकशाहीसाठी सुशिक्षित समाजाची नितांत गरज आहे. शिक्षित- नैतिक मुल्याधिष्ठित समाजाची लोकशाही ही सर्वाधिक यशस्वी किंवा हमखास यशस्वी करू शकेल .
आज शिक्षण महाग होत चालले आहे. सरकार शिक्षणाचे ओझे समाजावर लादू पाहत आहे. शिक्षण देणे ही शासनाची असताना, सद्या शासन खाजगी शिक्षण संस्थाना आणि खाजगी विद्यापीठांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांना या पुढे उच्च शिक्षण घेणे कठीण होणार आहे. पुढे लाखो- करोडो रुपये खर्च करणाऱ्या श्रीमंतांची मुलेच उच्च शिक्षण घेणार आहेत. शासनाने फक्त पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. यापुढील शिक्षणाची जबाबदारी शासन समाजाच्या डोक्यावर टाकू पाहत आहे. नाहीतर खाजगीकरणातुन शिक्षण देणे म्हणजेच आपोआप शिक्षणाची जबाबदारीतुन शासन अलगद बाजूला होणार आहे.
केवळ बाराखड्या शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदारशिक्षण शाळांनी दिले पाहिजे. इतका सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता. बाबासाहेबांच्या मते, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे.
डॉ बाबासाहेब म्हणायचे, ” शिक्षण हे असे काही आहे, की ते प्रत्येकाच्या आवाक्यात आणता आले पाहिजे, म्हणून शिक्षण विभागाचे धोरण निम्नस्तरीय वर्गासाठी शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके केले पाहिजे.”
पण आज डॉ. बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणारे शासन त्यांच्या विचाराना जाणीवपूर्वक बगल देवू पाहत आहे. गरीबांची मुलं आठवीपर्यंत शिक्षण घेतील. पुढे कुठेतरी मोलमजुरी करतील, गॅरेजमध्ये काम करतील, मोबाईल दुरुस्ती करतील, हॉटेलमध्ये वेटरचे काम करतील, काहीच नाही जमलं तर हमाली आहे. थोडक्यात उच्चवर्णिय , श्रीमंतवर्गाची सेवा करणे, त्यांच्याकडे काबाडकष्ट करणे हेच त्यांच्या नशीबी येणार आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब यांची जयंती व महानिर्वाण दिन साजरा करणाऱ्या दलित व बहुजनसमाजाने ” अच्छे दिनचे स्वप्न” दाखविणाऱ्या मोदीसरकारचा खरा चेहरा ओळखा . ” अच्छे दिन ” हे त्यांच्यासाठी आहेत. दलित , कष्टकरी व बहुजन समाजासाठी नाही. विकास म्हणजे नेमकं काय? आज प्रचंड महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे गरीब व सामान्य जनता भरडली जात आहे, याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही. २०१४ पासून तिपटीने महागाई वाढली आहे. आज भावनिक राजकारण केले जात आहे आणि सर्वसामान्य जनता याला बळी पडत असते, हे आपण समजून घेतले पाहिजे.
आज शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून डॉ. बाबासाहेब म्हणतात, ” नाचून मोठे होवू नका , तर वाचून मोठे व्हा. माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले कार्य प्राणपणाने पूर्ण करा जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकरी घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल .”
डॉ. बाबासाहेबांचे हे विचार काळाची गरज आहे. त्यांचे विचार आत्मभान जागृत करणारे आहेत.
……. प्रा . जयवंत पाटील,
भांडुपगाव , मुंबई – ४०० ०४२.
मो. नं. ९८६९००७३६१








