रत्नागिरी, दि. १७ : भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण व उत्तर) पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्यानंतर रत्नागिरीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रतन पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे.
यावेळी माजी आमदार तथा प्रभारी योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रमोद जठार, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि सतीश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेशकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश दाते, गणपत काळे, शिवसेनेचे प्रमोद इटले, काँग्रेसच्या विणा जावकर, माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, माजी सरपंच नम्रता कवळकर, नितीन मेणे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश चव्हाण, तसेच चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या प्रसंगी बोलताना भाजप नेत्यांनी कोकणात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठे बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








