लोकशाहीवरील विश्वास उडत चालला; गरज पडल्यास ‘ऑपरेशन कमळ’ राबवावे लागेल – उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजप, शिंदे गट आणि पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल; पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारीही जाहीर

मुंबई, दि. १९ : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील सध्याच्या राजकारणावर तीव्र टीका करताना त्यांनी, “आज देशात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर देशाला आणि विरोधी पक्षांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ राबवावे लागेल,” असा इशारा दिला.

शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन हा हिरकमहोत्सवी सोहळा असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “आज शिवसैनिक खचलेला किंवा दुःखी असेल असे अनेकांना वाटत असेल, पण प्रत्येक शिवसैनिक पेटून उठला आहे. आमचा संघर्ष सुरू आहे आणि तो अधिक ताकदीने पुढे नेला जाईल.”

‘३० वर्षे भाजपसोबत राहिलो, पण विलीन झालो नाही’

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, या आरोपांना उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “आम्ही ३० वर्षे भाजपसोबत युतीत राहिलो, पण भाजपमध्ये विलीन झालो नाही. मग काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र भाजपच शिंदे गटात विलीन होईल की काय, अशी शंका वाटते.”

भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, भाजपच्या अनेक खासदार आणि नेत्यांचे मूळ पक्ष वेगळे आहेत. “तुमच्याकडे स्वतःचे नेतृत्व तयार होत नसेल, तर आमची माणसे किती दिवस पळवणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मतदारांची जाहीर माफी मागतो’

पक्ष सोडून गेलेल्या खासदारांबाबत बोलताना उद्धव ठाकरे भावनिक झाले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “ज्या खासदारांनी पक्ष सोडला, त्यांच्या मतदारसंघातील सर्व मतदारांची मी जाहीर माफी मागतो. मोदींची लाट असतानाही तुम्ही आमच्यावर आणि बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होते. आज ते दुसऱ्या पक्षात गेले, त्याबद्दल मला दुःख आहे.”

लोकसभा निवडणुकीतील एका शेतकऱ्याचा अनुभव सांगताना त्यांनी धाराशिवमधील एका शेतकऱ्याने निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून स्वतःचा पैशांचा बटवा दिल्याचा प्रसंग सांगितला. “अशा सामान्य माणसांच्या विश्वासावर आपण खासदार निवडून आणले. आता हेच लोक पक्ष सोडत असतील, तर त्या मतदारांचा विश्वासघात कसा भरून काढणार?” असा सवाल त्यांनी केला.

शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका

मुख्यमंत्रीपदाच्या काळाचा उल्लेख करताना ठाकरे म्हणाले की, भाजपने दगा दिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यानंतर काही नेत्यांचा जळफळाट सुरू झाला.

“मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं आणि खायचं काम इतरांनी करायचं, अशी काहींची मानसिकता होती. मंत्रीपद, खासदारकी, मुख्यमंत्रीपद सगळं स्वतःलाच हवं होतं,” अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

‘देश अराजकतेकडे चालला आहे’

देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीसाठी धोकादायक ठरत आहे.

“आपण मतदारांना मशालचं बटण दाबा म्हणतो, शरद पवार तुतारीचं बटण दाबा म्हणतात. पण भाजप म्हणते कोणतंही बटण दाबा, माणूस आमच्याकडेच येणार. ही लोकशाहीची थट्टा आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

तसेच भाजपची वाटचाल ‘वन नेशन, वन इलेक्शन’ वरून ‘वन नेशन, नो इलेक्शन’ कडे सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

‘ऑपरेशन कमळ’ची घोषणा

भाजपच्या कथित फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी आता विरोधकांनी एकत्र यायला हवे, असे मत व्यक्त करत ठाकरे म्हणाले, “देशाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आता देशाला आणि आपल्याला मिळून ऑपरेशन कमळ करावे लागेल.”

या वक्तव्यामुळे आगामी राजकीय घडामोडींविषयी नव्या चर्चांना उधाण आले आहे.

पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी जाहीर

भाषणाच्या अखेरीस उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाने उपस्थित शिवसैनिकांसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

“माझ्या नेतृत्वावर होत असलेले आरोप तुम्हाला खरे वाटत असतील, तर मी या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. माझ्या जागी एखाद्या सामान्य, निष्ठावान शिवसैनिकाला बसवा. मला नेतृत्वाची हाव नाही,” असे ते म्हणाले.

मात्र त्यांनी यासोबत एक अटही घातली. “ही सोन्यासारखी शिवसेना गद्दार आणि दरोडेखोरांच्या हातात जाता कामा नये,” असे सांगत त्यांनी पक्षातील निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.

उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेनंतर सभागृहातील शिवसैनिकांनी उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना पद न सोडण्याची विनंती केली. त्यामुळे ठाकरे गटात आगामी काळात काही संघटनात्मक बदल होणार का, याबाबत आता राजकीय चर्चांना वेग आला आहे.

भाजपला इशारा

भाषणाच्या शेवटी भाजपला इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जर तुम्ही हेच राजकारण सुरू ठेवले, तर तुमची सत्ता फार काळ टिकणार नाही. लोकशाही आणि जनतेच्या विश्वासाशी खेळण्याची किंमत एक दिवस मोजावी लागेल.”

शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी सोहळ्यातील उद्धव ठाकरे यांचे हे भाषण आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ‘ऑपरेशन कमळ’, मतदारांची जाहीर माफी आणि पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी या तीन मुद्द्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

आणखी वाचा