मुंबई : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर सूचक भाष्य करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत चर्चा रंगल्या असतानाच शिंदे यांनी “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है,” असे म्हणत आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले, “आज अनेकांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. मी काय बोलणार, व्यासपीठावर कोण येणार आणि काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण आज हा टायगर तुमच्या समोर उभा आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.” त्यांच्या या विधानानंतर सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाशी फारकत घेतल्याने राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. या खासदारांच्या शिंदे गटात प्रवेशाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिंदे यांनी थेट घोषणा टाळत पुढील राजकीय हालचालींचे संकेत दिले.
आपल्या भाषणात शिंदे यांनी पक्षाच्या वाढीचा उल्लेख करत सांगितले की, “माझ्यासोबत ४० आमदार आले होते. आज ते ६० झाले आहेत. शिवसेना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनली आहे. बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गातून आपल्याला पाहत असतील आणि आशीर्वाद देत असतील.”
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेत असल्याचा दावा करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब केवळ नावात असून चालत नाहीत, तर ते विचारात आणि कामातही असले पाहिजेत. शिवसेना हा जमिनीचा तुकडा नाही, तर काळजाचा तुकडा आहे,” असे ते म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत “काही कुत्रे रोज भुंकत आहेत. कुत्रे झुंडीनं येतात, पण वाघ एकटाच येतो. कुत्रे भोगतात, टायगर शिकार करतो,” असा टोला लगावला.
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, “माझ्या पाठीशी कोणताही गॉडफादर नव्हता. एका सामान्य शिवसैनिकाला आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची संधी शिवसेनेने दिली. हीच या पक्षाची ताकद आहे.”
यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा सल्ला दिला. “शिवसैनिक हेच सर्वात मोठे पद आहे. निवडणुकीत आवडता असलेला कार्यकर्ता नंतर नावडता होता कामा नये. हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देतात,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शिंदे यांच्या ‘पिक्चर अभी बाकी है’ या वक्तव्यामुळे आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते किंवा लोकप्रतिनिधी शिंदे गटात दाखल होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ची पुढील राजकीय कथा नेमकी कशी उलगडते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








