मुंबई गोवा महामार्ग पुन्हा हिरवागार होणार

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हजार ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या तळेकांटे गावाने दोन हजार झाडं मुंबई गोवा महामार्गावर लावून मुंबई गोवा महामार्गावरील गावाचा परिसर पुन्हा एकदा हिरवागार करण्याचे स्वप्न बघितलं आहे. या स्वप्नपूर्तीची सुरवात येत्या 28 जून रोजी महामार्गवरील सप्तलिंगी पुलापासून बावनदी पुलापर्यंत साधारण 4 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा श्रमदानाने वृक्षारोपण करून होणार आहे. विकासाच्या नावावर विविध प्रकल्पांसाठी वृक्षतोड होत असताना गावातील लोकांनी एकत्र येत बघितलेले हे स्वप्न म्हणूनच महत्वाचे. कल्याणकारी राज्याची जबाबदारी सरकारची आहेच पण नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे या भावनेने आपला गाव, आपला परिसर स्वच्छ, हिरवागार असावा एवढी माफक अपेक्षा बाळगुन हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मे महिन्यात तळेकांटे गावातील देवळाच्या वर्धापन दिनी वाडीतील पूजेनिमित्त मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना अवकाळी पावसामुळे तब्बल 48 तास विजेविना काढावे लागले. शहरात सुखसोयीत राहण्याची सवय झालेल्या चाकरमान्यांना हे 48 तास बरंच काही शिकवून गेले. इतकी वर्षे शहरात राबून घर, जमीन, पैसा मिळवूनही गावात अडचणी आहेतच या अस्वस्थतेतून गावातील सगळे देवळात एकत्र जमले आणि बोलता बोलता गाडी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आली. मुंबई गोवा महामार्ग सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात काही लाख झाडे तोडण्यात आली, त्यालाही आता सोळा वर्षाच्या जास्त काळ लोटला आहे. मुंबई गोवा महामार्ग गेली 16/ 17 वर्षे अजून बनतोच आहे आणि तोडलेल्या झाडांमुळे महामार्गावरची रखरख तशीच आहे. यावर झाडं लावणं हा कायमस्वरूपी उपाय आहे पण मग सरकार झाडं कधी लावणार? सरकारसाठी थांबायचं का आपणच झाडं लावायची? अशा प्रकारे चर्चा झाली आणि मग मुंबईतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांच्या संकल्पनेतून मुंबई गोवा महामार्गावर झाडे लावण्याचा, तळेकांटे गावाने संकल्प केला.
तळेकांटे गाव तसे निसर्गरम्य, समुद्र सपाटी पासून थोडे उंचीवर असल्याने इथली हवा तशी थंडच. पण गावातून जाणारा मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, चार पदरी सिमेंटचा झाल्याने या परिसराचे एकूणच तापमान वाढलेले जाणवते. जोडीला हवामान बदलाचा परिणाम आहेच. उद्या ही उष्णता आणखी वाढली तर आपल्या पुढच्या पिढीला जगणं कठीण होईल. या संकटावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे स्थानिक झाडं लावणे. वड, पिंपळ, चिंच, उंबर यांसारखी स्थानिक झाडे फक्त सावली देत नाहीत; ती पाणी धरून ठेवतात, पक्षांना घर देतात, हवा थंड करतात आणि गावाला जिवंत ठेवतात. म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून झाडे लावण्याचा संकल्प केला. ग्रामपंचायतीनेही वृक्षारोपणासाठी झाडे देण्याचा निर्णय जाहीर केला. पर्यावरणासारख्या सामाजिक कामाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तळेकांटे गावातील लोकांनी एक वेगळी संस्कृती रुजविण्याचा, एक नवा पायंडा जिल्ह्यात रुजविण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
या निमित्ताने किमान एक झाड आणि त्याचे संगोपन करण्यासाठी निधी संकलनाचे आवाहन केलं गेलं. प्रत्येक झाडाभोवती लोखंडी जाळी, वर्षभर झाडाची निगा, पावसाळ्यानंतर पुढच्या जून पर्यंत टँकरने पाणी यासाठी निधी उभारून त्या निधीतून गाव स्वतःच्या ताकदीवर ती झाडे जगविण्याचा प्रयत्न करणार आहे. गावातील शहरात राहणारी तसेच परदेशात शिक्षण, नोकरीसाठी गेलेली तरुणाई यनिमित्ताने एकत्र येताना दिसत आहे. समाज माध्यमांवरुन आवाहन करणे, निधी संकलनात खारीचा वाटा उचलणे आणि प्रत्यक्ष श्रमदानासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असणे या तिन्ही पातळ्यांवर ही तरुणाई या कामासाठी सक्रिय झालेली दिसत आहे. गावातील जुन्या जाणत्या लोकांबरोबर ही तरुणाई खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे.
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर कामाच्या पूर्ततेसाठी मागील काही वर्षे सातत्याने आंदोलने होत आहेत. पण दिनांक 28 जून रोजी अवघा तळेकांटे गाव आंदोलनासाठी रस्ता अडवायला नाही तर रस्त्यावर सावली देण्यासाठी, गारवा निर्माण करण्यासाठी काही ‘नवनिर्माण ‘ करण्यासाठी ‘झाडे लावायला’ आपल्या कुटुंबासहित आलेला असेल तेव्हा त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. गावातील लोकांनी ठरविलेल्या या उपक्रमाची नोंद जिल्ह्याचे कलेक्टर, मुंबई गोवा महामार्गाचे अभियंता, जिल्ह्यातील माध्यमे, पत्रकार, पंचक्रोशीतील नागरिक निश्चितच घेतील. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचा उपक्रम महामार्गावरील इतरही गावं राबवतील व आपल्या गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावून परिसर हिरवागार करतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होतं आहे.
– सिरत सातपुते

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक
वडघर, ता. माणगाव, जि. रायगड

आणखी वाचा