मुंबई, दि. २२: तब्बल १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मान्सूनची दमदार आगेकूच सुरू झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगडमधील अलिबागपर्यंत, तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूरमार्गे पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि पुणे शहरापर्यंत प्रगती केली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड परिसर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांचा मोठा भाग मान्सूनने व्यापला आहे.
दरम्यान, मान्सूनच्या अरबी समुद्र शाखेने तेलंगणामार्गे दक्षिण विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापर्यंत मजल मारली आहे. सर्वच भागांत अद्याप जोरदार पाऊस झालेला नसला तरी मान्सूनी वारे सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामानातील बदलांमुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून राज्यभर पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी आणि सोमवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच इतर अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. जालना शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मान्सूनच्या या आगेकुचीमुळे बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.







