रत्नागिरी, दि. २२ : हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून तो महामार्गावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत डंपरखाली दबून जाकादेवी येथील पांचाळ कुटुंबातील महिलेचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे महिला रस्त्यावर फेकली गेली. त्यानंतर नियंत्रण गमावलेल्या डंपरखाली ती सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, याच ठिकाणी काही वेळापूर्वी रिक्षाचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या.
या दुर्दैवी घटनेमुळे जाकादेवी आणि खेडशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







