संगमेश्वर, दि. २४ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या सोनवी पुलावर मंगळवारी सकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन तिघेजण जखमी झाले. विशेष म्हणजे हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पहिला अपघात घडल्याने पुलावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या अपघातात झेवियर अल्वेरीस (वय ३१), शहीद पानाडी (२३) आणि सुरेश बांगर (३२) हे जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नियमितपणे वाहतूक सुरू असताना पुलाच्या दिशेने अचानक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक, बसस्थानकातील प्रवासी तसेच वाहनचालक घटनास्थळी धावले. त्यावेळी दोन मालवाहू ट्रक एकमेकांवर आदळल्याचे निदर्शनास आले.
मुंबईकडील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सध्या एकाच मार्गिकेतून मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे. सोनवी पुलाजवळ तीव्र वळण असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चालकांना वेळेवर येत नाही. एकाच मार्गिकेतून परस्परविरोधी दिशेने अवजड वाहने सोडली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवरच दोन ट्रक समोरासमोर आल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अपघातानंतर दोन्ही ट्रक पुलाच्या मध्यभागी अडकल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पुलावरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरू असताना पुरेसे दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना, रिफ्लेक्टर किंवा इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे. योग्य नियोजन आणि सुरक्षाव्यवस्था नसल्यास भविष्यात आणखी गंभीर अपघात घडू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
संध्याकाळपर्यंत या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.








