रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; पुढील तीन दिवस यलो अलर्ट

रत्नागिरी, दि. २५ : मान्सून सक्रिय झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर लक्षणीय वाढला असून जिल्हाभरात संततधार कायम आहे. बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण विभागात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. २५ ते २७ जून या कालावधीत यलो अलर्ट लागू राहणार असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. २८ जून रोजी कोणताही प्रमुख अलर्ट नसला तरी पावसाच्या सरी कायम राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ व २६ जून रोजी यलो अलर्ट, तर २७ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ८९७.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी पर्जन्यमान ९९.७१ मिमी इतके राहिले आहे. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात १३३.५७ मिमी नोंदवला गेला. त्याखालोखाल मंडणगड ११६.२५ मिमी, संगमेश्वर ११५.४१ मिमी, खेड १०४.८५ मिमी आणि रत्नागिरी १०१.३३ मिमी पाऊस झाला. याशिवाय गुहागर ९५.६० मिमी, लांजा ९१.४० मिमी, राजापूर ७६.८८ मिमी आणि चिपळूण ६२.११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून आता सक्रिय झाला असून पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

कोकणात पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला असून अनेक ठिकाणी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र काही भागांत अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने नदी-नाल्यांमधून पाणी उपसा करून शेताची मशागत केली जात आहे.

पावसाचा वाढता जोर लक्षात घेता जिल्ह्यातील महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा