रत्नागिरी, दि. ४ : रत्नागिरीच्या कन्या आणि प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. राधिका लोटलीकर पाठक यांची प्रतिष्ठित वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO) च्या संचालक मंडळावर (Board of Directors) २०२६ ते २०३० या कालावधीसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे भारतासह कोकणाच्या वैद्यकीय क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठा गौरव प्राप्त झाला आहे.
डॉ. राधिका या रत्नागिरीतील लोटलीकर हॉस्पिटलचे प्रमुख आणि ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय प्रभाकर लोटलीकर यांच्या कन्या आहेत. रत्नागिरीत शिक्षण घेतलेल्या डॉ. राधिकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जागतिक वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या त्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात स्ट्रोक तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, रत्नागिरीतील श्री रामनाथ हॉस्पिटलच्या अॅडव्हान्स्ड स्ट्रोक युनिटच्या संचालिका म्हणूनही मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पक्षाघातग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक आणि वेळेवर उपचार उपलब्ध होत आहेत.
एम.डी. आणि डी.एम. (न्युरॉलॉजी) पदवीधारक असलेल्या डॉ. राधिका यांनी स्ट्रोक आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या विकारांवरील विशेष प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांना युरोपियन डिप्लोमा इन स्ट्रोक इंटरव्हेन्शन ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय पदवीही प्राप्त आहे. स्ट्रोक इंटरव्हेन्शन, टेली-स्ट्रोक, मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार आणि जागतिक स्ट्रोक संशोधन क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
त्या भारताच्या ‘नॅशनल स्ट्रोक ॲक्शन प्लॅन २०२६’ च्या प्रमुख योगदानकर्त्या असून, WSO च्या ‘फ्युचर स्ट्रोक लीडर्स प्रोग्राम’ मध्येही त्यांची निवड झाली होती.
रत्नागिरीतून बारावीच्या राज्य मंडळाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्यानंतर त्यांनी मुंबईच्या के.ई.एम. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.डी., तसेच श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट, तिरुवनंतपुरम येथून डी.एम. (न्युरॉलॉजी) ही सुपर स्पेशालिटी पदवी संपादन केली.
डॉ. राधिका लोटलीकर पाठक यांच्या या जागतिक यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून, कोकणवासीयांकडून तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.








