रत्नागिरी, दि. ०५ : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव उपस्थित होते.
यावेळी बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य ॲड. पारिजात पांडे, ॲड. उदय वारुंजीकर, ॲड. विठ्ठल कोंडेदेशमुख, ॲड. विवेकानंद घाटगे, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. रंजना भोसले आणि ॲड. माधवी पोतदार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे आणि उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच बार कौन्सिलचे एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य एकत्र उपस्थित राहिल्याची नोंद यावेळी झाली.
प्रास्ताविकात ॲड. विलास पाटणे यांनी तरुण वकिलांसाठी सहाय्य निधी, वकिल संरक्षण कायदा, वकिलांविरुद्धच्या तक्रारींचा जलद निपटारा, सुरक्षा समितीची स्थापना आणि वेल्फेअर फंड योजनेची प्रभावी अंमलबजावणी यांसह विविध मागण्या बार कौन्सिलसमोर मांडल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांनी बार असोसिएशन ही वकिलांची मातृसंस्था असल्याचे सांगत रत्नागिरीतून अधिकाधिक न्यायाधीश घडावेत यासाठी व्याख्यानमालेसारखे उपक्रम सुरू असल्याचे नमूद केले. या प्रयत्नांना बार कौन्सिलचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲड. पारिजात पांडे यांनी न्यायालयीन पायाभूत सुविधा, नवोदित व महिला वकिलांसाठी आवश्यक सोयी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कोल्हापूर खंडपीठातील नव्या सुविधांची माहिती दिली. ॲड. उदय वारुंजीकर यांनी वकिलांच्या आर्थिक हिताच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. ॲड. विठ्ठल कोंडेदेशमुख यांनी रत्नागिरीतील वकिलांच्या प्रश्नांसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली, तर ॲड. विवेकानंद घाटगे यांनी कोकणातील वकिलांनी कोल्हापूर खंडपीठाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
ॲड. अहमदखान पठाण यांनी ॲडव्होकेट वेल्फेअर फंड अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ॲड. रंजना भोसले यांनी महिला वकिलांनी बार कौन्सिलच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के मतदान करावे तसेच त्यांच्या समस्या थेट कौन्सिलसमोर मांडाव्यात, असे सांगितले. ॲड. माधवी पोतदार यांनी महिला वकिलांच्या सेवेसाठी कायम बांधील राहणार असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विलास पाटणे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन ॲड. अवधूत कळंबटे यांनी केले. कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वकील, विधिज्ञ, बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी विधी सेवा प्राधिकरणाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.








