४० कोटींच्या सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह; रत्नागिरी रेल्वेस्टेशन छत कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मनसेची मागणी

रत्नागिरी, दि. ८ : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सजावटीच्या छताचा काही भाग पुन्हा कोसळल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. यावेळी चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, सुजित घाणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दुसऱ्यांदा छत कोसळल्याने गुणवत्तेवर प्रश्न

रविवार, ५ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या रिक्षा स्टँडकडील सजावटीच्या छताचा मोठा भाग अचानक कोसळला. सुदैवाने त्या वेळी त्या ठिकाणी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, यापूर्वीही स्थानकाच्या उद्घाटनापूर्वी अशाच प्रकारे छताचा भाग कोसळल्याची घटना घडली होती. एकाच ठिकाणी अल्पावधीत दोनदा अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

४० कोटींच्या कामाचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी

मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण व ऑडिट करण्यात यावे. दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत समाविष्ट करावे, तसेच कामावर देखरेख ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आले असले, तरी उद्घाटनापूर्वी आणि उद्घाटनानंतर अशा दोन वेळा छत कोसळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज हजारो प्रवाशांची या स्थानकावर वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना गर्दीच्या वेळी घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देखरेखीवर आणि कंत्राटदाराच्या कामावर प्रश्न

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेतून निधी उपलब्ध झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम पूर्ण करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या निधीच्या कामात गुणवत्ता नियंत्रणाची योग्य अंमलबजावणी झाली का, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी केली का आणि कंत्राटदार न्याती कंपनीच्या कामावर पुरेशी देखरेख ठेवण्यात आली का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

९ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्थानकाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर अवघ्या काही कालावधीत दोनदा छत कोसळल्याने संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

नागरिकांची निष्पक्ष चौकशीची मागणी

या घटनेमुळे केवळ कंत्राटदारच नव्हे, तर कामाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संपूर्ण प्रकल्पाचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रवासी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा