‘प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी आईचे संस्कार, प्रार्थना आणि कष्ट असतात’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुरबाड (ठाणे), दि. ११ : प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार, तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर त्याग करणाऱ्या मातृशक्तीचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्या वतीने मुरबाड येथे आयोजित ‘आई महोत्सव-२०२६’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केले होते.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं…’ या कवितेच्या ओळी सादर करत मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आई म्हणजे लेकराची माय, वासराची गाय, धरणीची ठायी असते. एखाद्या व्यक्तीच्या यशामागे अनेकांचा वाटा असतो, पण त्या यशाचा भक्कम पाया आईच रचत असते,” असे त्या म्हणाल्या.

आज सन्मानित होत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या परिश्रमांसोबतच आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा त्याग असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यास सलाम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवक, कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने काम केले असून, कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी सुनेत्रा पवार यांचे स्वागत करत, “दादांनंतर पक्षाचे काय होणार, अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्याचा वसा समर्थपणे पुढे नेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही,” असे सांगितले. ठाणे जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क उभारणे, स्टेडियमला मान्यता देणे तसेच अजित पवार यांच्या नावाने मार्शल आर्ट अकादमी सुरू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि मातांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅ. आशिष दामले यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे तसेच मुरबाड येथे प्रतिक हिंदूराव यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार दौलत दरोडा, नजीब मुल्ला, ज्योती हिंदूराव, किसनराव तारमळे, प्रतिक हिंदूराव, संजय तिवरे, प्रशांत एगडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा