पाकिस्तानशी कथित डिजिटल संपर्काच्या संशयावरून चिपळुणातील दोघे एटीएसच्या ताब्यात; राज्यभर कारवाईचे धागेदोरे कोकणापर्यंत

चिपळूण, दि. ११ : पाकिस्तानस्थित गँगस्टर तथा दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्काच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणात धडक कारवाई केली. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या कारवाईत दोघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अनेक तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना काही अटींसह सोडण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या प्रकरणातील व्यक्तींची ओळख, चौकशीतील निष्कर्ष किंवा कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील शहजाद भट्टी याच्याशी संबंधित कथित सोशल मीडिया अकाउंट किंवा डिजिटल युजर आयडीद्वारे महाराष्ट्रातील काही युवक संपर्कात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर राज्यभर एकाचवेळी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली. प्राथमिक तपासातून मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे एटीएसचे पथक चिपळूणपर्यंत पोहोचल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभर सुमारे १५० ठिकाणी एटीएसने एकाचवेळी छापेमारी केली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील कारवाईनंतर तपासाची व्याप्ती रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपर्यंत विस्तारली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील काही युवकांची चौकशी करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे चिपळूणातील संशयितांपर्यंत तपास पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

एटीएसने ताब्यात घेतलेल्या दोन्ही तरुणांकडील मोबाईल फोन, लॅपटॉप, सोशल मीडिया खाती, चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी करण्यात आली. संबंधितांनी शहजाद भट्टी किंवा त्याच्याशी संबंधित अकाउंटशी कोणत्या कारणासाठी संपर्क साधला होता, त्या माध्यमातून कोणती माहितीची देवाणघेवाण झाली होती का, आर्थिक व्यवहार झाले होते का किंवा इतर कोणते नेटवर्क सक्रिय होते का, याचा तपास सुरू आहे.

तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत अद्याप कोणताही ठोस किंवा गुन्हा सिद्ध करणारा पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे संबंधितांना अटक करण्यात आलेली नसून चौकशीनंतर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी शहराबाहेर जाऊ नये, अशा सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

या कारवाईनंतर चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोकणासारख्या तुलनेने शांत भागात दहशतवादविरोधी पथकाची कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणांनीही सतर्कता वाढवून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित व्यक्तींचा संपर्क केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की त्यामागे कोणते व्यापक गुन्हेगारी किंवा दहशतवादी जाळे कार्यरत होते, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. तपास यंत्रणांनीही या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

एटीएसचा तपास अद्याप सुरू असून, डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, मोबाईल डेटा विश्लेषण आणि इतर तांत्रिक तपासणीनंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्यातील सुरक्षा यंत्रणांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

(टीप : या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीवर अद्याप अधिकृतपणे गुन्हा दाखल झाल्याची किंवा आरोप सिद्ध झाल्याची माहिती उपलब्ध नाही. एटीएसकडून तपास सुरू असून पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.)

आणखी वाचा