स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार

राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश केला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै रोजी जारी केले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन देऊन अजितदादा पवार यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला.

परिपत्रकानुसार, २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व यंत्रणांमार्फत या कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रशासनावर मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागाळातील जनतेसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना जनमानसात ‘दादा’ म्हणून विशेष स्थान मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि लोकसेवेच्या वारशाचा अधिकृतपणे गौरव केला जाणार आहे.

आणखी वाचा