येडगेवाडीतील पाणीवंचित कुटुंबीय आंदोलनाच्या पवित्र्यात ; मागण्या मान्य न झाल्यास ३० जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा

संगमेश्वर, दि. १५ : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कुटगिरी-येडगेवाडी येथील पाच कुटुंबे गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ३० जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी नुकतेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. त्यामध्ये, राजिवली ग्रामपंचायतीअंतर्गत कुटगिरी-येडगेवाडी येथील १४ कुटुंबांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शासकीय विहिरीवरून खाजगी नळपाणी योजना सुरू केली होती. ही योजना सुरळीत सुरू असताना ऐन उन्हाळ्यात काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाईपलाईन तोडून पाच कुटुंबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी गटविकास अधिकारी तसेच तहसीलदारांकडे लेखी तक्रार करूनही तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यानंतर संबंधित कुटुंबांनी राजिवली ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन शासकीय विहिरीवरून स्वखर्चाने स्वतंत्र नळपाणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही व्यक्तींनी त्यालाही बेकायदेशीर हरकत घेत कामात अडथळे निर्माण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शासकीय विहिरीत बसविण्यात आलेला विनापरवाना पंप जप्त करावा, सामायिक जमिनीत टाकलेली अनधिकृत पाईपलाईन तात्काळ हटवावी, तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू असलेली नळपाणी योजना पूर्ण करण्यास सहकार्य करावे किंवा शासनाने पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास ३० जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

निवेदन देताना रामचंद्र येडगे, धोंडिबा येडगे, हरिश्चंद्र येडगे, शंकर येडगे, अनंत येडगे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

आणखी वाचा