मुंबई, दि. १५ : शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेत निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टी, महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारी (१६ जुलै) मुंबईतील आझाद मैदानावर शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे आंदोलन होणार असल्याची माहिती पक्षाच्या आंदोलन कोअर कमिटीने दिली.
अलीकडच्या काळात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांतील कथित पेपरफुटी व गैरप्रकारांमुळे विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षार्थींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याची मागणी आंदोलनातून केली जाणार आहे.
आंदोलनकर्त्यांनी केंद्राचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच परीक्षा गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. एमपीएससीसह सर्व स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण विषयक प्रश्नांवर आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने होणार असून मुंबई पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








