विनायक राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा; जादूटोणा, अघोरी विधींचे आरोप, सून गिरीजा राऊत यांचे गंभीर आरोप

फिरोज बाबा अटकेत

ठाणे, दि. १२ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिरोज बाबा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.

सात वर्षे मानसिक व शारीरिक छळाचा आरोप

तक्रारीनुसार, २०१७ मध्ये गिरीजा राऊत यांचा गितेश राऊत यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पतीने वैवाहिक संबंध टाळले, तसेच वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचारांऐवजी विविध तथाकथित बाबा, भगत आणि तांत्रिकांकडे नेऊन अंधश्रद्धाजन्य विधी करण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

गोमूत्र पाजणे, केस उपटणे, अंगारे-धुपारे

तक्रारीतील आरोपांनुसार, सावंतवाडीतील फिरोज बाबा, राजापूरातील काझी बाबा आणि सिंधुदुर्गातील हरिश्चंद्र घाडी या तथाकथित भगतांकडून विविध अघोरी विधी करण्यात आले. महिलेच्या डोक्यावर पाणी शिंपडणे, लिंबू कापून मंत्रोच्चार करणे, अंगारे-धुपारे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या, कच्च्या माशांचे तुकडे, जिवंत कोंबडा वापरणे, डोक्यावरील केस उपटणे तसेच गोमूत्र पिण्यास भाग पाडणे अशा अमानुष प्रकारांचा आरोप तिने केला आहे.

या विधींना विरोध केल्यास शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचाही तक्रारीत उल्लेख आहे.

“हनिमूनपासूनच वैवाहिक आयुष्य विस्कळीत”

गिरीजा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विवाहानंतर उटी येथे हनिमूनला गेल्यानंतरही पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. “मेंटल कनेक्ट महत्त्वाचे आहे,” असे सांगून ते टाळाटाळ करत राहिले. २०१८ नंतर आमच्यात कोणतेही वैवाहिक संबंध राहिले नाहीत. त्यानंतर मूल होण्यासाठी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून विविध धार्मिक विधी करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

तसेच, स्वतःच्या राहणीमानावर, कपड्यांवर आणि वागणुकीवर बंधने घालण्यात आली होती. माहेरी बोलतानाही स्पीकरफोनवरच बोलण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

वकिलांची सर्व आरोपींना अटकेची मागणी

गिरीजा राऊत यांचे वकील ॲड. सागर कदम यांनी या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले असून, सर्व आरोपींना अटक करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

गिरीजाच्या आईची न्यायाची मागणी

गिरीजा राऊत यांच्या आई पूजा पवार यांनीही मुलीवर सातत्याने अन्याय झाल्याचा आरोप करत, “आमच्या मुलीला न्याय मिळावा. मुलाची उणीव लपवण्यासाठी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून तिच्यावर अमानुष विधी करण्यात आले. संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी केली.

विनायक राऊत यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गिरीजा आणि गितेश हे गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत असून, घटस्फोटाचा वाद सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “आर्थिक मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ही तक्रार करण्यात आली आहे. अघोरी उपचार किंवा जादूटोण्याचे सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही न्यायालयात आपली बाजू मांडू,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

तपासाकडे राज्याचे लक्ष

या प्रकरणामुळे कोकणासह राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा, महिलांवरील मानसिक छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासात कोणती तथ्ये समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(टीप : या वृत्तातील आरोप हे तक्रारदारांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर आधारित आहेत. संबंधित आरोपींनी अनेक आरोप फेटाळले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयीन किंवा तपास प्रक्रियेनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.)

आणखी वाचा