दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाचवेळी ‘वर्षा’वर; राजकीय चर्चांना उधाण

एनडीएत जाण्याच्या चर्चांचे सुप्रिया सुळे यांनी खंडन जयंत पाटील म्हणाले – मुख्यमंत्र्यांची भेट केवळ मतदारसंघातील कामासाठी; डिलिमिटेशनवर विधेयक आल्यानंतरच भूमिका

मुंबई, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष एनडीएच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, या सर्व चर्चांचे खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. पक्षाने अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. माध्यमांमध्ये केवळ सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसारित होत आहेत. पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अशा प्रकारचे विधान केलेले नाही.” या संदर्भात आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे विजय (बंटी) पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाबाबत बोलताना सुळे यांनी सरकारने अद्याप नवीन विधेयक संसदेत मांडले नसल्याचे सांगितले. “विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करून २४ तासांत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करू,” असे त्या म्हणाल्या. लोकसंख्येच्या आधारेच पुनर्रचना झाल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याने सर्व राज्यांना समान निकष लागू व्हावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ ७२ करण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील ८० जागा १२० करण्यासारखा समान निकष लागू करण्याची संकल्पना पूर्वीच्या बैठकीत चर्चेला आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीबाबत जयंत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले. “मी इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातील मतदारसंघातील प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आमची पाच ते दहा मिनिटांचीच चर्चा झाली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत माझी कोणतीही राजकीय बैठक झाली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरण किंवा एनडीएमध्ये प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगत जयंत पाटील म्हणाले, “आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंध आहोत. अशा चर्चा वारंवार रंगवल्या जात असल्याचे दुःख वाटते.”

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. “खातेवाटपाचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे. मी अशा कोणत्याही चर्चेचा विचार केलेला नाही. तुम्ही खूप पुढचा विचार करत आहात,” असे ते हसत म्हणाले.

दरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या बैठकीमागे राजकीय अर्थ शोधला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली असली, तरी बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भेटीमागे नेमके कोणते राजकीय किंवा प्रशासकीय विषय होते, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी मतदारसंघ पुनर्रचना, केंद्रातील महत्त्वाची विधेयके आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे यामुळे विविध पक्षांमध्ये संवाद सुरू असू शकतो. मात्र, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांचे स्पष्ट खंडन केल्याने सध्या तरी या चर्चा केवळ राजकीय अंदाजांपुरत्याच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात या भेटीचे खरे राजकीय परिणाम काय होतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा