आनंद… Happiness… खुशी…
नेमका आनंद कशात आहे, हे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपल्याला कशात समाधान मिळते, हे प्रत्येकाने स्वतःच शोधायला हवे. कारण आनंद हा कुठे बाहेर सापडणारा खजिना नसतो; तो आपल्या विचारांत, दृष्टिकोनात आणि जगण्याच्या पद्धतीत दडलेला असतो.
आजकाल एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काही लोकांच्या आयुष्यात सतत तक्रारी, कुरकुर, दोषारोप आणि नकारात्मकतेचीच मालिका सुरू असते. प्रत्येक संभाषणात ते किती अडचणीत आहेत, किती संघर्ष करत आहेत किंवा आयुष्याने त्यांच्यावर किती अन्याय केला आहे, हेच पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते. नकळत त्यामागे सहानुभूती मिळवण्याची अपेक्षाही दडलेली असते.
संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. प्रत्येकाची लढाई वेगळी असते. पण प्रत्येक वेळी त्या संघर्षाचे ओझे इतरांच्या खांद्यावर ठेवून नेमके काय मिळते? मनातील वेदना प्रत्येकालाच सांगणे आवश्यक असते का? सतत त्याच जखमा उघड्या करून दाखवल्याने त्या भरून येत नाहीत; उलट वेदना अधिक तीव्र होतात.
आपण ज्या गोष्टींसाठी धडपड करतो, त्या बहुतांश भौतिक सुखांसाठीच असतात—चांगली नोकरी, अधिक पैसा, स्वतःचे घर, आधुनिक सुविधा. या सर्वासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. पण त्या मिळवण्याच्या धडपडीत आजचा आनंद हरवू नये. कारण उद्याच्या सुखाच्या शोधात आपण आजचं हसणं विसरतो.
मित्रपरिवारात, कुटुंबात किंवा एखाद्या मैफिलीत आपण आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन गेलो, तर आपली उपस्थिती इतरांसाठीही आनंददायी ठरते. मात्र प्रत्येक वेळी नकारात्मकतेचे ढग घेऊन गेलो, तर वातावरणही नकळत भारावून जाते. याचे भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
याचा अर्थ असा नाही की दुःख मनातच दडवून ठेवावे. विश्वासू व्यक्तीजवळ मन मोकळे करणे आवश्यकच आहे. पण प्रत्येक संवाद जर फक्त तक्रारी, हळहळ आणि नाराजी यांचाच झाला, तर त्यातून ना स्वतःला दिलासा मिळतो, ना नात्यांना उब मिळते. निर्माण होतो तो फक्त मानसिक ताण.
शांतपणे जगण्यातही एक वेगळा आनंद असतो. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि जे नाही त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहणे, हीच खरी जीवनपरिपक्वता आहे. सतत कुरकुर करून काहीही मिळत नाही; उलट त्याचा त्रास स्वतःलाही होतो आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांनाही.
म्हणूनच हल्ली एक गोष्ट जाणीवपूर्वक करावीशी वाटते—सतत नकारात्मकता पसरवणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत दोष शोधणाऱ्या आणि अखंड कुरकुर करणाऱ्या लोकांपासून थोडेसे अंतर ठेवावे. कारण आपल्या मानसिक शांततेची किंमत कोणत्याही नात्यापेक्षा कमी नाही. आपल्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचे, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
आनंदी माणसं ही समस्याच नसल्यामुळे आनंदी नसतात. ती समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधतात. प्रत्येक क्षणी आनंदी राहणे शक्य नसले, तरी समाधानी राहणे नक्कीच शक्य आहे.
लक्षात ठेवा, आनंदी राहण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते; परिपक्व विचारांची गरज असते. दुःख जपण्यापेक्षा आनंद जपायला शिका. आनंद शोधण्यापेक्षा तो अनुभवायला शिका. कारण आनंदी राहणं ही नशिबाची देणगी नसून, जगण्याची एक सुंदर कला आहे. आणि ती प्रत्येकाने स्वतःच्या प्रयत्नांनी आत्मसात करायची असते.

— माधवी अजिता अरुण जाधव (मधूजा) ©️








