गणपतीच्या दिवसांत दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो!

‘धर्माच्या वादात गुंतवून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लावण्याचा डाव’; राज ठाकरेंचा इशारा

ठाणे, दि. ०६ :: गणेशोत्सवाच्या काळात देशात दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. देशासमोरील गंभीर प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्म आणि जातीच्या मुद्द्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे सुजाण हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात रविवारी (६ सप्टेंबर) आयोजित मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

“१४ तारखेला गणपती येतील. मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसांत दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशात दंगली घडवल्या जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही अडकले पाहिजे आणि तुमचे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले पाहिजे, असा प्रयत्न होऊ शकतो,” असा दावा राज ठाकरे यांनी केला.

यावेळी त्यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांना विशेष आवाहन केले. “जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुस्लिम आहे, दोघांनीही सतर्क राहावे. आपल्या नावाने किंवा त्यांच्या नावाने कोणीतरी या वादात घुसवले जाऊ शकते आणि दंगली घडवल्या जाऊ शकतात. हकनाक आपली मुले आणि त्यांची मुले यात जातील,” असे ते म्हणाले.

धर्माच्या मुद्द्यांत गुंतवून ठेवण्याचा आरोप

देशातील बेरोजगारी, शिक्षण, उद्योग आणि आर्थिक परिस्थिती यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात गुंतवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. तरुणांना रोजगार मिळत नाही, मिळालेली नोकरी टिकेल की नाही याची शाश्वती नाही, कुटुंबाचा खर्च भागवताना अडचणी येत आहेत आणि आजारपण आल्यास कुटुंब कर्जबाजारी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात सुरू असलेल्या डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या वादाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. “डीजे वाजवायचा की नाही, ध्वनिवर्धकाचा आवाज किती असावा, याच चर्चेत तुम्ही गुंतून राहा. मात्र शिक्षण मिळतेय का, रोजगार मिळतोय का, याकडे दुर्लक्ष व्हावे,” असे राज ठाकरे म्हणाले.

आर्थिक परिस्थितीवरून सरकारला सवाल

देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ७.८ टक्के सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीच्या आकडेवारीवरूनही प्रश्न उपस्थित केला. “जर देशाचा विकासदर ७.८ टक्के आहे, तर परदेशात जाऊ नका आणि सोने खरेदी करू नका, असे का सांगितले जात आहे?” असा सवाल त्यांनी केला.

देशातील बेरोजगारीसह अनेक गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधताना २०२१ ते २०२६ या कालावधीत ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातील कामकाज बंद केल्याचा दावा त्यांनी केला. ही आकडेवारी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची असल्याचेही त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असून भविष्यात देशातील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

महापुरुषांच्या रांगेत मोदींचा फोटो नको

पुण्यात सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तो हटवल्याच्या घटनेवरही राज ठाकरे यांनी भाष्य केले.

“छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असायला हवा; मात्र तो दुसऱ्या भिंतीवर लावावा,” असे राज ठाकरे म्हणाले.

सरकारी कार्यालये, शाळा आणि इतर संस्थांमध्ये कोणाची छायाचित्रे कोणत्या ठिकाणी लावली जावीत, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. “आत्ताच सुधारून घ्या,” असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा