लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीकडून दांडे आंडोम शाळेला कपाट भेट

रत्नागिरी, दि. ५ : तालुक्यातील दांडे आंडोम, वरची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेला लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीकडून शाळेच्या गरजेनुसार कपाट भेट देण्यात आले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्लबकडून विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत.

क्लबच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार तातडीने मदत केली जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून दांडे आंडोम येथील शाळेला कपाट देण्यात आले. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा बंडबे यांनी क्लबचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीचे अध्यक्ष ला. प्रथमेश गायकवाड, बी.ओ.डी. ला. जयंत जोशी, खजिनदार ला. अभिजित पंडित आणि ला. धनश्री पालांडे उपस्थित होते.

दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त क्लबतर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा बंडबे आणि अंगणवाडी मदतनीस पूजा यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ला. धनश्री पालांडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्ष प्रथमेश गायकवाड आणि ला. जयंत जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका श्रद्धा बंडबे यांनी सत्काराला भावपूर्ण उत्तर देत लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात क्लबच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा