राष्ट्रपतींच्या हस्ते अर्चना जाधव यांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ने गौरव

नाशिक, दि. ०५ : त्र्यंबकेश्वर येथील दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ट्रेड विभागाच्या निदेशिका श्रीमती अर्चना राकेश जाधव (मोरे) यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीमती अर्चना जाधव यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी तसेच व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, शैक्षणिक योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान त्र्यंबकेश्वर ITI तसेच नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षक, विद्यार्थी, सहकारी आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणारा हा राष्ट्रीय सन्मान असून, अर्चना जाधव यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल ही इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आणखी वाचा