सावर्डे, दि. १५ : सणासुदीच्या काळातही माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारी घटना सावर्डे येथे घडली. ८ ते १० लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग रिक्षामध्ये सापडल्यानंतर मांडकी (बौद्धवाडी) येथील रिक्षाचालक धर्मपाल रामचंद्र पवार यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता ती बॅग तिच्या मालकाच्या स्वाधीन केली.
सावर्डे बाजारपेठ (ढालकाठी) येथील ओम साई रिक्षा चालक-मालक संघटनेच्या रिक्षा स्टँडवर धर्मपाल पवार रिक्षा व्यवसाय करतात. त्यांच्या रिक्षेत गुळवणणे येथील रहिवासी अमोल बेटकर यांची दागिने व रोख रकमेने भरलेली बॅग राहून गेली होती. बॅगमध्ये सुमारे ८ ते १० लाख रुपयांचा ऐवज असल्याचे सांगण्यात आले.
बॅग सापडल्यानंतर धर्मपाल पवार यांनी प्रामाणिकपणे तिच्या मालकाचा शोध घेतला. अमोल बेटकर यांच्याशी संपर्क साधून कोणताही स्वार्थ न ठेवता बॅग जशीच्या तशी परत केली. अचानक आपली लाखो रुपयांची मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने अमोल बेटकर भावूक झाले. त्यांनी धर्मपाल पवार यांचे मनापासून आभार मानले.
धर्मपाल पवार यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे. आर्थिक मूल्यापेक्षा माणुसकी आणि विश्वासाला महत्त्व देणाऱ्या या कृतीमुळे सावर्डे येथील रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. त्यांच्या या आदर्शवत कृतीबद्दल नागरिकांकडून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.








