चिपळूण, दि. १९ (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्करराव जाधव हे येत्या गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करण्यासाठी भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. गुहागर शिवाजी चौक येथे सर्व कार्यकर्ते एकत्र येवून भगव्या वातावरणात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ पासून सुरु होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप किवा उमेदवार जाहीर झालेले नसले तरीही उमेदवारी मिळणार हे निश्चित असलेल्यांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त काढण्यास सुरुवात केली आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शक्ती प्रदर्शांसह २४ ला उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त काढला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे ३० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांनी प्रचार यंत्रणा तळागाळात पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तसेच अर्ज भरण्याचा मुहूर्त काढला आहे.
गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव हे २४ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता शिवाजी चौक गुहागर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शक्ती प्रदर्शनासह रॅली काढणार आहेत. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाजवळ निवडणूक आयोगाच्या दालनात अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी शृंगारतळी बाजारपेठेमध्ये सकाळी १०.०० वाजता त्यांचे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत होणार आहे.रत्नागिरी विधानसभेचे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत हे २२ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शक्यता आहे. राजापूर – लांजा मधून शिंदे शिवसेनेतर्फे किरण सामंत २४ रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. चिपळूण – संगमेश्वर मधील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार शेखर निकम यांनी २८ रोजी चा मुहूर्त काढला आहे. मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज दाखल होणार असल्यामुळे प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरु आहे.