मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून बोधगया भेटीची संधी; रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना सुवर्णसंधी

यात्रेकरूंचा प्रवास रेल्वेमार्गे होणार असून, प्रवास, निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था शासनामार्फत होणार आहे

रत्नागिरी, दि. ६ : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना बिहार राज्यातील जागतिक कीर्तीच्या बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. बौद्ध धर्मातील चार पवित्र स्थळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या ठिकाणासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी निवड केली असून, जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २० मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव (दूरध्वनी क्र. ०२३५२-२३०९५७) येथे संपर्क साधावा. संबंधित कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

बोधगया यात्रेचा कालावधी ३ जून ते ९ जून २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत यात्रेकरूंचा प्रवास रेल्वेमार्गे होणार असून, प्रवास, निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था शासनामार्फत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थीला एका वेळेसच यात्रेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. निवड प्रक्रियेत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर अर्जदारांची निवड केली जाणार आहे.

राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळत असून, रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र नागरिकांना मुंबई विभागामार्फत एकत्रितपणे या यात्रेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन बोधगया येथील पवित्र स्थळाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा