रत्नागिरी, दि. २७ (प्रतिनिधी): उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळासाहेब माने हे आपला उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. आठवडा बाजार येथील आमदार राजन साळवी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित येणार आहेत. येथून सकाळी मिरवणुकीने ते अर्ज भरणार आहेत. या वेळी शक्ती प्रदर्शन करणार आहेत. या वेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी भाजपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले आणि लगेच पक्षातर्फे रत्नागिरी विधानसभेसाठी एबी फॉर्म दिला. यानंतर ते रत्नागिरीमध्ये आल्यानंतर त्यांचे रत्नागिरी रेल्वे स्थानक आणि शिवसेना शाखेमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. रत्नागिरीमध्ये गेल्या 20 वर्षात विकास झाला नाही तसेच रत्नागिरीकरांना गृहीत धरले जाते, त्यामुळे रत्नागिरीकरांच्या सांगण्यानुसार परिवर्तन होण्याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला, असे बाळ माने यांनी सांगितले.
उद्या श्री. माने निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. त्याकरिता त्यांनी जय्यत तयारी ठेवली असून सकाळी नऊ वाजता शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. त्यानंतर तिथे मेळावा होईल आणि तिथून प्रांताधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक अर्ज भरण्यात येणार आहे.