रत्नागिरी, दि. २८ (प्रतिनिधी): कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे २०२४ सालच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात CMD श्री संतोष कुमार झा यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘सदाचार प्रतिज्ञा’ देऊन करण्यात आली. हा सप्ताह २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साजरा केला जात आहे, जो ३१ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीशी संलग्न आहे.
या जनजागृती अभियानांतर्गत कार्यसंस्कृती व प्रामाणिकता, आचार नियमावली, खरेदी प्रक्रिया, सायबर सुरक्षितता व स्वच्छता, तसेच नीती व शासकीय पारदर्शकता यावर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांचे उद्दिष्ट कर्मचार्यांना नैतिक आचार विचारांची महत्त्वाची जाण व कार्यस्थळी पारदर्शकतेची आवश्यकता याची जाणीव करून देणे आहे.
आज “सत्यनिष्ठा की संस्कृति से राष्ट्र की समृद्धि” या विषयावर NACIN मुंबईचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक, श्री प्रभात कुमार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख भाषण दिले.
श्री संतोष कुमार झा, CMD, KRCL, यांनी उपस्थितांना संबोधित करताना दैनिक कामकाजात दक्षता व प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी दक्षता विभागाच्या ‘सचेतक’ ई-बुलेटिन (Vol. XIV) चे प्रकाशन श्री संतोष कुमार झा यांच्या हस्ते करण्यात आले.
रत्नागिरी व कारवार क्षेत्रात विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा होत असून, कर्मचार्यांमध्ये प्रामाणिकतेची संस्कृती वृद्धिंगत करण्याचे काम या निमित्ताने केले जात आहे.