गुहागर, दि. २९ (प्रतिनिधी) : गुहागर विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून एकूण तेरा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आज गुहागर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष माजी सैनिक सुनिल जाधव यांनी आपला ‘तेरा’वा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी अर्ज जरी अपक्ष भरला असला तरी ते वंचित बहुजन आघाडीचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने खेड, चिपळूण, गुहागर येथील बहुसंख्य वंचित चे पदाधिकारी, कार्यकर्ते सुनिल जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
सुनिल जाधव हे वंचित चे तालुक्यातील एक कणखर नेतृत्व आहे. सर्व समाजामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्यामुळे तालुक्यामध्ये वंचित चे चांगले संघटन उभे राहिले आहे. तालुक्यातील स्थानिक उमेदवार असल्याने विविध सामाजिक संघटनांनी त्यांना भेटून शुभेच्छा देवून पाठिंबा दर्शविला आहे.
जरी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असला तरी यापुढील रणनीती ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसारच आखण्यात येईल. त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यास या विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद उभी राहील, असे सुनिल जाधव यांनी सांगितले. विधानसभा मतदार संघामध्ये वंचित चे मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत. येथे वंचित चा उमेदवार न दिल्याने येथिल संघटन विस्कळीत होऊ नये, आंबेडकरी चळवळ जीवंत राहावी यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असला तरी मी वंचित चा सक्रीय कार्यकर्ता आहे, यापुढेही मी वंचित बहुजन आघाडीचेच काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
माजी सैनिक सुनिल जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने गुहागर विधानसभा अतिशय चुरशीची होणार यात शंका नाही.