रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी): रत्नागिरी पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्याने (शिक्षण) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेला मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशा असभ्य भाषेचा वापर केला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात आला. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्या लंपट विस्तार अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी अभय तसेच पाठबळ देत आहेत का? अशी गंभीर चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
शासनाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून केणी नावाच्या शिक्षकावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्या विस्तार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास चालढकल का केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्याच्यावर कारवाई कधी होणार?, याकडे लक्ष लागले आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याध्यापिकेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि शिक्षणाधिकारी कासार यांच्याकडे त्या विस्तार अधिकाऱ्याची लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. मात्र, ८ ते १० दिवस उलटले तरी त्याकडे गांभिर्याने न पाहिल्याने सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही सामाजिक संघटनांनी याप्रकरणी जोर धरून कारवाईची मागणी केल्यावर त्या अधिकाऱ्याऱ्याच्या चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बाथरूममध्ये नातेवाईकांशी माफी
त्या मुख्याध्यापिकेसह ग्रामस्थ व नातेवाईक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यासाठी गेले असता त्या विस्तार अधिकाऱ्याने सुरुवातीला नकार दिला. मात्र, नातेवाईकांनी त्याला फैलावर घेतल्यानंतर त्याने आपली चूक कबूल करून माफी मागितली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन गेलेल्या नातेवाईकाला परिषद भवनातील शिक्षण विभागाच्या शेजारील बाथरुममध्ये बोलावून त्यांचेशी त्या विस्तार अधिकाऱ्याने माफी मागितली. तरीही त्या नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष करून कारवाईची मागणी केली.
ते प्रकरण वेगळेच
शाळेच्या रेकॉर्डची तपासणी केली म्हणून मुख्याध्यापिकेने खोटे आरोप लावण्यात आल्याचे भासविण्यात येत आहे. प्रत्यक्षात ते प्रकरण वेगळेच असल्याचे बोललं जात आहे. तो अधिकार एका शिक्षिकेला ने-आण करण्याची सेवा अगदी प्रामाणिकपणे बजावत होता. साहेबाचा हात डोक्यावर असल्याने इतर सहकाऱ्यांची आपण कसही वागले तरी चालेल, अशा तोऱ्यात शिक्षिका होती. मात्र, मुख्याध्यापिकेने त्या शिक्षिकेला तिच्या चुकीच्या वागणुकीबद्दल विचारणा केली म्हणूनच त्या विस्तार अधिकाऱ्याने अचानक तपासणी केली आणि पुढील प्रकरण घडले, असे बोलले जात आहे.
आणखी एका शिक्षिकेची तक्रार
तो विस्तार अधिकारी रत्नागिरी नगर परिषदेच्या शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी पदावर तात्पुरता कार्यरत आहे. तेथेही कार्यालयात बोलावून प्रेमाच्या गोष्टी करून त्या शिक्षिकेला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच जाळ्यात अडकत नसल्याने त्या शिक्षिकेची सहा ते सात वेळा बदली केली. या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी कारवाईची मागणी केली आहे. मात्र, या तक्रारीकडेही गांभिर्याने न पहाता त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्या लंपट विस्तार अधिकाऱ्याला प्रशासन पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरू आहे.