संगमेश्वर, दि. १३ (प्रतिनिधी): तालुक्यातील गडनदी धरण हे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजना आणि राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून उभारण्यात आले आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ९५१ कोटी रुपये खर्च झाला आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर गडनदी धरणावर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेरे बसवल्याने धरणावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे.
गडनदी धरणाची लांबी ६०६ मीटर तर उंची ७२.७० मीटर एवढी आहे. धरणाचा डावा कालवा २७ कि.मी. व उजवा कालवा ४७ कि. मी लांबीचा आहे. गडनदी धरणाची पाणीपातळी क्षमता १२१.८० मिटर एवढी आहे. ६६.३८७ एवढ्या क्षमतेचा उपपाणीसाठा होत असून एकूण पाणीसाठा क्षमता ६६.६९९ द.ल.घ. मी एवढी आहे. मात्र सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब संतोष येडगे यांनी जलसपंदा विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. धरण बांधावर आणि परिसरात सुरक्षा उपाययोजना म्हणून सिसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी देखील राजिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष येडगे यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती.
गडनदी धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गडनदी धरण परिसरात सुरक्षा उपाययोजना म्हणून धरण क्षेत्र संपूर्ण सीसीटिव्ही कक्षेत आणने खूप महत्त्वाचे होते. जलसंपदा विभागाकडून धरण क्षेत्रात तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. मागणीचा विचार केल्याने संतोष येडगे यांनी जलसपंदा विभागाचे कोकण प्रदेश मुख्य अभियंता मिलिंद नाईक, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, उप विभागीय अभियंता इनामदार, अभिजित कदम आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.








