वैशालीताई निमकर यांची भाजप ओबीसी सेल महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड

चिपळूण, दि. १५ : भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. वैशालीताई निमकर यांची भाजप ओबीसी सेल महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. चिपळूण येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदन केले.

वैशालीताई निमकर यांनी पक्षात काम करताना अनेक पदांवर कार्य केले आहे. त्यांनी सुरुवात चिपळूण शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून केली होती. त्यानंतर त्या भाजप शहर अध्यक्ष झाल्या व त्यांच्या कार्यकाळात भाजपला नगराध्यक्ष आणि पाच नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. पुढे त्यांना उत्तर रत्नागिरी जिल्हा चिटणीसपदी निवडण्यात आले होते.

मनोगत व्यक्त करताना त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले व ओबीसी महिलांसाठी सरकारच्या योजनांचा लाभ बचत गटांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवून महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.

आणखी वाचा