नवरात्रोत्सव: देवीसमान स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक जागर

अश्विन महिन्याच्या शरद ऋतूच्या प्रारंभी साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा स्त्रीरूपी देवतेचा आदर आणि सन्मान व्यक्त करणारा उत्सव आहे. नऊ दिवसांचा हा पर्व चैतन्य, मंगलमयता आणि आध्यात्मिक उर्जा देणारा असतो. प्रत्येक वर्षी लोक नऊ देवीच्या विविध रूपांची पूजा, आरती आणि विधी पद्धतीने पार पाडतात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महादुर्गा आणि सिद्धिदात्री या नऊ देवीच्या रूपांमध्ये करुणा, ममता, धाडस, सामर्थ्य, संयम, सहनशीलता, न्याय आणि जिद्द यासारखे गुण प्रकट होतात. हे गुण प्रत्येक भक्ताला आत्मसात करून स्वतःच्या जीवनात अंगिकारायला उद्युक्त करतात.

नवरात्र उत्सवादरम्यान समाजातील स्त्रीशक्तीच्या महत्त्वावरही लक्ष वेधले जाते. देवीसमोर पूजा, आरती, दांडिया व गरबा खेळणे हे उत्सवाचे भाग असले तरी समाजातील स्त्रियांसोबत वागण्याच्या दृष्टिकोनात अद्याप फरक दिसतो. स्त्रियांवरील हिंसा, अत्याचार, कौटुंबिक छळ, लैंगिक शोषण आणि समाजातील असमानतेचा अनुभव दररोज अनेक महिला भोगत आहेत. हे वास्तव नाकारता येणार नाही.

स्त्री ही केवळ घरातली गृहिणी नाही, तर शिक्षण, उद्योग, व्यवसाय, विज्ञान, कला, अवकाश, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. आई म्हणून ती त्याग करते, पत्नी म्हणून साथ देते, मुलगी म्हणून मायेची सावली बनते. घर, मुलांचे संगोपन, कुटुंबाची सेवा, व्यवसाय व सामाजिक कार्य – स्त्री या सर्व भूमिकांना संतुलित आणि सामर्थ्यशाली पद्धतीने सांभाळते. पुरुषांच्या तुलनेत स्त्री संयम, समजूतदारपणा, ममता आणि सहनशीलतेने परिस्थिती हाताळते, तरीही समाजातील अत्याचार कमी होत नाहीत. बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, मुलींवर होणारे अन्याय अजूनही वाढत आहेत.

नवरात्र हा उत्सव केवळ मूर्तीतल्या स्त्रीरूप देवीचा आदर करण्यापुरता मर्यादित नाही. हा उत्सव समाजातील प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या अधिकारांचा, न्यायाचा आणि सुरक्षिततेचा सन्मान करण्यासाठी देखील एक संधी आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीसारखी अढळ, खंबीर राहण्याचे सामर्थ्य मिळावे; कलशातील स्वच्छ पाणी प्रमाणे मनही शुद्ध राहावे, असा संकल्प करणे आवश्यक आहे. यावेळी प्रत्येकाने स्वतःच्या मनातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा निर्धार करावा.

या नऊ दिवसांत स्त्रीसन्मानाच्या विविध संकल्पांची सुरुवात केली जाऊ शकते. “बेटी बचाव, बेटी पढाव”, मुलींचा जन्म साजरा करणे, तिच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे, लैंगिक व कौटुंबिक हिंसाचार रोखणे हे प्रमुख संकल्प असू शकतात. स्त्रीच्या अस्तित्वाचा आदर करणे, तिच्या ममत्व, त्याग, धैर्य आणि योगदानाचा सन्मान करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पुरुषांनी मर्दानी अहंकार, ताकद आणि मी-मानाचा भाव बाजूला ठेवून स्त्रीच्या योगदानाचा आदर करणे गरजेचे आहे.

देवीच्या मूर्तीच्या पूजा व आदरासह स्त्रीसमानतेचा संदेशही प्रसारित करणे महत्त्वाचे आहे. स्त्रीशक्ती फक्त धार्मिक रूपात नाही तर समाजात वास्तवात जिवंत राहते. प्रत्येक वाईट नजरेला, अनुचित स्पर्शाला, अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य स्त्रियांमध्ये असते; आणि नवरात्र उत्सवादरम्यान हा संदेश प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

स्त्रीशक्तीचा जागर करताना प्रत्येकाने संकल्प करावा की, महिलांना समान संधी, सुरक्षितता आणि समाजातील योग्य स्थान मिळेल. न्याय मागण्यासाठी बोलणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि स्वतःचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी झटणे आवश्यक आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान करताना समाजातील प्रत्येक स्त्रीला योग्य स्थान देणे, तिच्या अधिकारांसाठी प्रयत्न करणे आणि हिंसा- अत्याचारांविरुद्ध लढणे हेच खरी श्रद्धा आहे.

नवरात्र उत्सव हा स्त्रीसन्मान, सामाजिक जागर आणि देवीच्या शक्तीचे प्रतीक आहे. देवीच्या मूर्तीप्रमाणे स्त्रीसुद्धा शक्तिशाली, धैर्यशील आणि सहनशील आहे; समाजाने तिचा आदर, सन्मान व संरक्षण सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

— माधवी जाधव, संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग

आणखी वाचा