रत्नागिरी, दि. ०४ : हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘शक्ती’ चक्रीवादळाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वादळाचा प्रभाव शनिवारपासून मंगळवार (7 ऑक्टोबर) पर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हा अलर्ट लागू करण्यात आला असून, या काळात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने ताशी 45 ते 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारं वाहण्याचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात सध्या सक्रिय असलेले ‘शक्ती’ वादळ काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये समुद्रात ऊफाण सुरू असणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छीमारांसाठीही सखोल सूचना जारी केल्या आहेत. पुढील काही दिवस मच्छीमारांनी खोल समुद्रात जाण्याचे टाळावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण आणि इतर किनारी भागात मच्छीमारांना बंदरावरच थांबवण्यात आले आहे. समुद्रातील लाटांची उंची वाढल्यामुळे वादळाचा धोका अधिक आहे.
हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर प्रशासनाचे प्रतिनिधींनी परिस्थितीचा आढावा घेतला. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मदत पथकांना सतर्क ठेवले असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
वादळाचा परिणाम फक्त किनारपट्टीत नाही तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांनाही होऊ शकतो. हवामान खात्यानुसार, या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतीसाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
राज्य सरकारने पर्यटकांसाठीही चेतावणी जारी केली आहे. समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे, तसेच किनारपट्टीवर राहणाऱ्यांचे सुरक्षित स्थलांतर करावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. सर्व जिल्ह्यांमधील मदत पथकांना सतर्क ठेवले आहे.
सध्या वादळामुळे समुद्रात उफाळ होणार असून, किनारपट्टीवर नागरिकांसह मच्छीमार आणि पर्यटकांनाही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हवामान खात्याचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर नजर ठेवत आहेत.
हवामान विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, फक्त अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने वादळाच्या तातडीच्या परिस्थितीसाठी तयारी सुरू केली आहे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
‘शक्ती’ वादळामुळे आगामी दिवसांत कोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, उंच लाटा आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी, मच्छीमारांनी आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे अधिकृत अधिकारी सांगतात.