मुंबई, दि. २० : आपल्या अप्रतिम विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना वर्षानुवर्षे हसवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज (२० ऑक्टोबर) वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना शरीराने साथ न दिल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
गोवर्धन असरानी हे मूळचे राजस्थानमधील जयपूरचे. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर अभिनयाची आवड जोपासत मुंबई गाठली. १९६७ साली त्यांच्या गुजराती चित्रपटातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘हरे कांच की गुडिया’, ‘नमक हराम’, ‘कोशीश’, ‘बावर्ची’, ‘परिचय’, ‘अभिमान’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाच्या प्रत्येक अंगावर प्रभुत्व मिळवत असरानी यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.
‘शोले’ चित्रपटातील “अंग्रेजों के जमाने का जेलर” ही त्यांची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या खास आवाजात बोललेले संवाद, चेहऱ्यावरील हावभाव आणि हलकाफुलका विनोद यामुळे ते प्रत्येक घराघरात लोकप्रिय झाले. त्यांच्या अभिनयात सहजता आणि निरागसता होती.
१९९० च्या दशकात आणि त्यानंतरही असरानी यांनी आपली ओळख कायम ठेवली. ‘जो जीता वही सिकंदर’, ‘घरवाली बहारवाली’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘दे दना दन’, ‘बोल बच्चन’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी विनोदी तसेच सहाय्यक भूमिका साकारल्या. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांत काम केलं.
त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक युग संपले आहे. विनोदाला एक वेगळं रूप देणारा हा बहुआयामी अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला, पण त्यांच्या भूमिका आणि संवाद मात्र कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील.