थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी रत्नागिरीत बौद्ध समाजाचा विराट मोर्चा; कम्युनिटी हॉलच्या नावाखाली फसवणुकीविरोधात संघर्ष

रत्नागिरी, दि. २७ (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीत डीएसपी बंगला जवळील थिबाराजाकालीन बुद्धविहाराच्या जागेवर नगरपरिषदेकडून कम्युनिटी हॉल (समाजमंदिर) बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात अखेर बौद्ध समाजाचा प्रचंड रोष उसळला. जोरदार विरोधाची मोर्चेबांधणी करूनही ‘थिबाराजाकालीन बुद्धविहार संघर्ष समिती’च्या आवाहनाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात तुडुंब गर्दी उसळली. हा जनसमुदाय केवळ आंदोलन नव्हे, तर “बाबासाहेबांच्या आणि तथागत बुद्धांच्या विचारांचा विजय” म्हणून पाहिला जात आहे.

शासनाची जमीन, समाजाचा हक्क, पण राजकीय दबावाखाली फसवणूक
डीएसपी बंगला परिसरातील साडेसतरा गुंठे जागा महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने आरक्षित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केली होती. ही जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी विशेष ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मात्र, त्या ट्रस्टनेच नंतर ही जमीन रत्नागिरी नगरपरिषदेच्या ताब्यात दिली. नगरपरिषदेकडून या जागेवर ‘बुद्धविहार’ न बांधता ‘कम्युनिटी हॉल (समाजमंदिर)’ उभारण्याचा प्रस्ताव तयार करून नगरोत्थान निधीतून तब्बल आठ कोटी रुपये मंजूर केले.

शासनाच्या कागदावर ‘कम्युनिटी हॉल’, आणि प्रत्यक्षात नाव ‘बुद्धविहार’ — ही पद्धत समाजाची व तथागत बुद्धांच्या विचारांची उघड फसवणूक असल्याचं समाजातील सुज्ञ घटकांनी ओळखलं. यानंतर खरा संघर्ष सुरू झाला.

राजकीय दबावाखाली ट्रस्ट, पण समाजात जागृतीची लाट
थिबाकालीन ट्रस्टचे पदाधिकारी अजूनही राजकीय दबावाखाली ‘कम्युनिटी हॉल’च्या प्रस्तावावर ठाम आहेत. पण समाजातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत या निर्णयाविरोधात आवाज उठवला. “बुद्धविहाराच्या नावाखाली समाजाची दिशाभूल केली जात आहे” या जाणिवेतून ‘थिबाराजाकालीन बुद्धविहार संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली.

या समितीने

गावागावातून जनजागृती मोहीम राबवली. समाजातील कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाने मोर्चा यशस्वी करण्यासाठी झोकून दिलं. बौद्ध समाजात एक स्वाभिमानी आवाज निर्माण झाला — “आपल्या हक्काच्या जागेवर फक्त बुद्धविहारच हवा!”

मोर्चाला विरोध करणारेच ठरले “स्पेशल फेल”
मोर्चा अयशस्वी करण्यासाठी काही राजकीय आणि धार्मिक संघटनांनी प्रयत्न केले. काहींनी समाजाला मोर्चात सहभागी होऊ नये असं आवाहन केलं, तर काहींनी सोशल मीडियावर विरोधी संदेश प्रसारित केले. पण बौद्ध समाजाने या नकारात्मक मोहिमेकडे दुर्लक्ष करून एकजुटीने संघर्ष समितीच्या पाठीशी उभं राहिलं. परिणामी, विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आणि “स्पेशल फेल” ठरले.

बुद्धविहारासाठीचा मोर्चा ठरला ऐतिहासिक आणि यशस्वी
सोमवारी निघालेला मोर्चा पूर्णपणे शांततेच्या मार्गाने, पण अतिशय जोशात पार पडला. समाजातील महिलांचा, युवकांचा आणि वरिष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. रत्नागिरीच्या रस्त्यांवर “जय भिम”, “बुद्धं शरणं गच्छामि”, “आम्हाला हक्काचं बुद्धविहार हवं” या घोषणांनी वातावरण भारावून गेलं.

या मोर्चाच्या यशाचं श्रेय संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावागावातील स्वाभिमानी नागरिकांना दिलं जात आहे. त्यांचा निर्धार स्पष्ट — “ही जागा केवळ समाजाची नाही, ती बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रतिक आहे. तिचं रक्षण आमचं कर्तव्य आहे.”

हा संघर्ष सुरूच राहील…
मोर्चानंतरही संघर्ष समितीने स्पष्ट केलं आहे की हा लढा इथेच थांबणार नाही. जोपर्यंत समाजाच्या हक्काची जागा ‘बुद्धविहार’ म्हणून जाहीर होत नाही, तोपर्यंत ही चळवळ सुरू राहील.

रत्नागिरीतून उमटलेला हा स्वाभिमानी आवाज आज केवळ स्थानिक प्रश्न राहिलेला नाही — तर तो समतेच्या, न्यायाच्या आणि बौद्ध विचारांच्या पुनर्जागरणाची हाक ठरत आहे.

“ही भूमी बुद्धांची आहे, आणि इथे मनुवाद, फसवणूक, अन्याय टिकणार नाही!”

आणखी वाचा