काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. काश्मीर मधील निसर्गाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे विशेषतः हिवाळ्यात काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरमधील निसर्ग जीवनात एकदातरी अनुभवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाने काश्मीरला जे दान दिले आहे तसे दान इतर कोणत्याही प्रदेशाला दिले नाही म्हणूनच काही जण काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग असेही म्हणतात. झेलम, चिनाब, निडर आदी नद्यांचे खळखळते पाणी, हिरवीगार जंगलसंपदा आणि बर्फाच्छादित पर्वत, धुक्याने पांघरलेली चादर त्यामुळे काश्मीर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे मात्र याच काश्मीरला गेल्या काही वर्षापासून कोणाची तरी नजर लागली.
काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पोसला सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पृथ्वीवरील या नंदनवनात पर्यटक जीव मुठीत धरूनच येत असे मात्र केंद्र सरकारने काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्याने तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटक पुन्हा परततील अशी आशा वाटू लागली. झालेही तसेच मागील वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. काश्मीरमध्ये पर्यटक परतू लागल्याने स्थानिक काश्मिरी लोकांनाही रोजगार मिळू लागला. काश्मीरचे गेलेले वैभव परत येऊ लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक पर्यटक काश्मीरला भेट देतील असे वाटू लागले होते. पर्यटकांनी नंदनवन पुन्हा बहरू लागेल असे वाटत असतानाच काश्मीरला पुन्हा कोणाची तरी नजर लागली.
यावर्षी काश्मीरमधील निसर्गाने खप्पा मर्जी केली. निसर्ग रुसल्याने यावर्षी म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील सर्वांचे आवडते थंड हवेचे ठिकाण. काश्मीरला जाणारा पर्यटक आवर्जून गुलमर्गचा निसर्ग अनुभवायला गुलमर्ग ला भेट देतोच मात्र यावर्षी गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात च म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. अगदी तुरळक बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना बर्फातील स्कियिंग आणि अन्य खेळ खेळता येत नाहीत त्यामुळेच अनेक पर्यटकांनी काश्मीर चे केलेले बुकिंग रद्द केले आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५० टक्के पर्यटकही आले नाहीत. पर्यटक नसल्याने हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला. काही चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रीकरणही रद्द केले आहे. पर्यटक येत नसल्याचा परिणाम काश्मीरच्या अर्थ्यवस्थेवरही झाला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांनी बहरलेले हे नंदनवन आज पर्यटकांविना ओस पडले आहे.
गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती असे तेथील जाणकार सांगतात. इतका कमी बर्फवृष्टी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती असेही तेथील काही लोक सांगतात. यावर्षी निसर्गाने काश्मीरवर अवकृपा केल्याने काश्मीरच नाही तर देश चिंतेत आहे. यावर्षी जरी निसर्गाने अवकृपा केली असली तरी पुढील वर्षी तरी निसर्ग काश्मीरवर कृपा करेल पृथ्वीवरील हे नंदनवन पर्यटकांनी पुन्हा बहरेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकच नव्हे संपूर्ण देशातील नागरिक व्यक्त करत आहेत.
– श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५








