संगमेश्वर, दि. २० (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांबेडी येथील समाज मंदिर ग्रामपंचायतने तेथील ग्रामस्थांना विचारात न घेता जमीन दोस्त केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. समाजात अस्वस्थता पसरविणाऱ्या या घटनेमुळे ग्रामस्थांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गावामध्ये ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी सुरु असताना अचानकपणे त्या आधी दोन दिवस दि. ४ डिसेंबर रोजी तांबेडी बौद्धवाडी येथील समाजमंदिर ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आले.यामुळे तेथील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली . मात्र दोषींवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसल्याने या प्रकरणी ग्रामस्थांनी आता जिल्हाप्रशासनाकडे धाव घेतली आहे. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी मा. सूर्यवंशी यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
समाज मंदिर हे समाजाचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उपयुक्त ठिकाण समजले जाते . समाजमंदिरासाठी ग्रामपंचायत कडून विशेष सहकार्य व योजना राबविण्यात येतात मात्र तांबेडी ग्रामपंचायतकडून असा निर्णय का घेण्यात आला ? या मागे नेमके कोणते कारण असू शकते ? समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा उद्रेक कसा थांबणार ? असे एक ना अनेक प्रश्न परिसरात चर्चेचा व चिंतेचा विषय बनू लागले आहेत.
समाजाच्या एकोपा टिकवणारे समाज मंदिरच ग्रामपंचायतीने दि.4 डिसेंबर रोजी जमीन दोस्त करण्याचे ठरविल्याने तांबेडी येथील ग्रामस्थ संतापले आहेत. समाज मंदिर उध्वस्त झाल्याने तसेच समाज मंदिराची तोडफोड करताना ग्रामस्थांना विचारात न घेतल्याने सदरचा प्रकार जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नातून तर झाला नाही ना ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कारण सहा डिसेंबर रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात त्यामध्ये सहभागी व अधिकचे जनकल्याणकारी उपक्रम राबविण्या ऐवजी गावामध्ये ग्रामपंचायतीकडून अशा प्रकारे असंवेदनशीलता दाखविणारे व अधिकारांचा गैरवापर करणारे कृत्य घडल्याने युवा सामाजिक कार्यकर्ते रोहीत ताबे यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात तांबेडी येथील ग्रामस्थांनी पोलीसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. तब्बल एक महिना अधिक कालावधी उलटून गेला तरी सुद्धा कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून न झाल्याने आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा तांबेडीतील ग्रामस्थांनी दिला आहे . अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रोहित तांबे यांनी दिली आहे.
दरम्यान सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 4 डिसेंबर रोजी समाज मंदिर बाबत तोडफोड चा निर्णय का घेण्यात आला अशी विचारणा केली असता सदरचे समाज मंदिर हे ग्रामपंचायत हद्दीत असल्याने ते आम्ही ठेवू किंवा तोडू हा आमचा प्रश्न असल्याचे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले अशा प्रकारच्या भाषेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे . दोषींवरती कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया कडून बहुजनांचे युवा नेतृत्व असलेले रोहित तांबे यांनी दिला आहे.








