चिपळूण, दि. २० (प्रतिनिधी) : सलग दोन दिवस मुसळधार पाऊस आणि पूरपाणी यामुळे चिपळूण शहर पुन्हा एकदा भीतीच्या छायेत आले होते. घराबाहेर नदीसारखं वाहणारं पाणी, मुसळधार पावसामुळे ढासळणारी भिंती, अडकलेले रस्ते या सर्व परिस्थितीने नागरिक भयभीत झाले होते. मात्र या संकट काळात प्रशासनाची कर्तव्यनिष्ठा आणि धीर देणारा आवाज नागरिकांना आधार ठरला.
चिपळूणचे प्रांताधिकारी श्री आकाश लिगाडे यांनी अक्षरशः २४ तास जागून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. सतत अद्ययावत माहिती देत राहणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे “मी आहे, घाबरू नका. पाणी तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊ देणार नाही,” असा विश्वास देणे – या भूमिकेमुळे चिपळूणकरांच्या मनात मोठा दिलासा निर्माण झाला.
शहरभर पसरलेल्या चिंतेच्या वातावरणात लिगाडे यांचा धीर देणारा संवाद लोकांसाठी आशेचा किरण ठरला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले. “अशा कठीण प्रसंगात अधिकारी फक्त आदेश देतात, पण लिगाडे सरांनी लोकांसोबत खंबीरपणे उभे राहून माणुसकी दाखवली,” अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या.
पूरस्थितीवर मात करताना प्रशासनाचे तातडीचे निर्णय, मदत कार्याची तत्पर अंमलबजावणी आणि प्रांताधिकारींचा नागरिकांशी थेट संवाद यामुळे या वेळी शहराने मोठ्या आपत्तीपासून स्वतःचा बचाव केला. चिपळूणकरांनी एकमुखाने व्यक्त केलेले आभार हे त्यांच्या कार्याचा ठसा उमटवणारे ठरले आहेत.








