अरांक्षा यादव रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलिस अधिकारी

२०२३ बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; नीलेश माईनकर यांची पालघरला बदली

रत्नागिरी, दि. २६ : रत्नागिरीच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदाची जबाबदारी आता २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विद्यमान उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आठ परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (दि. २५) जारी करण्यात आले असून, त्यामध्ये अरांक्षा यादव यांचा समावेश आहे.

अरांक्षा यादव यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला विशेष प्राधान्य दिले होते. रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी स्वीकारताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारीला आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यासमोर विविध आव्हाने असणार आहेत.

नीलेश माईनकर यांची काही दिवसांपूर्वी पालघर येथे जातपडताळणी विभागाचे डीवायएसपी म्हणून बदली झाली होती. मात्र, त्यांच्या जागी तत्काळ नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने माईनकर हे काही काळ रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. आता अरांक्षा यादव यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उपविभागाला नियमित नेतृत्व मिळाले आहे.

अरांक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये देशात २०२ वा क्रमांक पटकावला होता. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या यादव यांचे शिक्षण दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेज तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले आहे.

प्रशासकीय सेवेत प्रवेशानंतर सुरुवातीला त्यांना गुजरात कॅडर मिळाले होते. मात्र, २०२१ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे कॅडर महाराष्ट्रात बदलण्यात आले.

रत्नागिरी उपविभागात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच अमली पदार्थविरोधी कारवाई, महिला व बालकांच्या सुरक्षेचे प्रश्न, वाढती वाहतूक आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पोलिस प्रशासनाला अधिक गतिमानता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा