लोककल्याणकारी राजा- छत्रपती राजर्षी शाहू महाराज

मुलांनो, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना आपण सगळेच ओळखतो. त्यांच्या कार्याची महानता आज आपण जाणून घेऊया. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या तालुक्यात 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाडगे असे होते. वडील जयसिंगराव आई राधाबाई यांचे ते लाडके होते. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले तो काळ होता 1884 चा.‌ छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे अज्ञान, दारिद्र्य, मागासलेपण ,दुःख जाणार नाही. अंधश्रद्धेमध्ये हा समाज अडकून पडला तर त्यांची केव्हाच प्रगती होणार नाही. हे शाहूंच्या लक्षात आले होते; म्हणूनच छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला. तांत्रिक शिक्षणाबरोबरच लष्करी शिक्षण सुरू केले. गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून ठिकठिकाणी वसतिगृहांची स्थापना केली. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व सवलती जाहीर केल्या. सन 1902 मध्ये शाहू महाराजांनी राज्यातील मागासवर्गीयांसाठी प्रशासकीय सेवेत 50 टक्के जागा राखीव ठेवल्या. अनेक शाळा काढल्या.

शाहू महाराजांनी सन 1917 मध्ये विधवा विवाहाचा कायदा करून विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. महार वतने बंद करून रयतवारी सुरू केली. वेठबिगारी बंद केली. अस्पृश्यांना व्यवसाय स्वातंत्र्य दिले. शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या. जातीभेदाला तीव्र विरोध केला. एप्रिल 1919 मध्ये भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या अखिल भारतवर्षीय क्षत्रिय महासभा संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या तेराव्या अधिवेशनात महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. ‘मोठ्या दिलाचा राजा’, ‘उदार राजा’, ‘लोककल्याणकारी राजा ‘,’समान हक्क प्रस्थापित करणारा न्यायराजा ‘अशी ओळख त्यांना समाजाने दिली. धर्माच्या नावावर जेव्हा युद्धे पेटत होती, जातीच्या नावावर जेव्हा माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नव्हती ; अशा काळात लोकोद्धार करणाऱ्या राजाचे स्मरण अखंड तरुण पिढीला कायमस्वरूपी असलेच पाहिजे. ज्ञानदान व अन्नदान करण्याचे दातृत्व महाराजांकडे होते. सर्वांप्रति समान न्यायाची भूमिका ठेवणारा राजा आज जन्मणे कठीणच. दिनांक 6 मे, 1922 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले. तो दिवस आजही आपणा सर्वांसाठी वेदनादायी. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे आपल्यावर अनंत काळचे उपकार आहेत. त्यांच्या जयंती दिवशी आपण त्यांच्या कार्याला चला, अभिवादन करूया.

– श्रीमती मानसी मंगेश चव्हाण
रत्नागिरी
मो.नं. 9130669565

आणखी वाचा