आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्माच्या इतिहासातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. ही पौर्णिमा केवळ गुरुपौर्णिमा म्हणूनच नव्हे, तर धम्म, संघ आणि साधनेच्या नव्या पर्वाचा प्रारंभ म्हणूनही ओळखली जाते. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटना या दिवशी घडल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बौद्ध परंपरेनुसार याच दिवशी महाराणी महामाया यांना सिद्धार्थाच्या जन्माची गर्भधारणा झाली. पुढे याच दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या पाच माजी सहकाऱ्यांना प्रथम धम्मोपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. याच प्रसंगातून भिक्खू संघाची स्थापना झाली आणि जगात धम्माचा प्रसार सुरू झाला. या पाच भिक्खूंनी भगवान बुद्धांना आपले गुरु मानले, म्हणूनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
याच दिवसापासून वर्षावास या पवित्र परंपरेलाही प्रारंभ होतो. भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही जगभरातील बौद्ध भिक्खू संघ जपतो. आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंतचा तीन महिन्यांचा हा कालावधी भिक्खूंनी एका ठिकाणी राहून धम्मसाधना, अध्ययन, अध्यापन आणि लोकप्रबोधन करण्यासाठी राखून ठेवलेला असतो. बुद्धांनी स्वतः अनेक वर्षावास करून या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
वर्षावास म्हणजे आत्मशुद्धीचा काळ
वर्षावास हा केवळ भिक्खू संघासाठी नसून प्रत्येक धम्मोपासकासाठी आत्मपरीक्षण, आत्मशुद्धी आणि धम्माचरण करण्याची सुवर्णसंधी आहे. या काळात बुद्धविहारांमध्ये त्रिशरण-पंचशील ग्रहण, त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, विपश्यना ध्यान, धम्मदेशना, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन, उपोसथ आचरण, धम्मचर्चा आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.
या उपक्रमांमुळे श्रद्धा अधिक दृढ होते, मन प्रसन्न होते आणि समाजात बंधुभावाची भावना वृद्धिंगत होते. म्हणून प्रत्येक बौद्ध कुटुंबाने या तीन महिन्यांत शक्य तितक्या वेळा बुद्धविहारात जाऊन या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. केवळ उपस्थिती नोंदविणे नव्हे, तर धम्म समजून घेऊन तो जीवनात उतरविणे हेच वर्षावासाचे खरे फलित आहे.
धम्माचे आचरण हीच खरी साधना
भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म हा अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा चमत्कारांवर आधारित नाही. तो विवेक, करुणा, प्रज्ञा आणि समतेचा मार्ग आहे. त्यामुळे वर्षावासाच्या काळात प्रत्येकाने दररोज काही वेळ धम्मग्रंथ वाचनासाठी राखून ठेवावा. वाचनाबरोबर चिंतन, मनन आणि कुटुंबीयांशी धम्मविषयक चर्चा व्हावी. ज्यांना वाचन शक्य नाही त्यांनी धम्मवचने ध्वनिमुद्रित स्वरूपात ऐकावीत.
याशिवाय भिक्खू संघाला भोजनदान, चिवरदान, औषधदान, प्रवासखर्च किंवा धम्मकार्याकरिता आवश्यक साहित्याचे दान करणे हीही पुण्यप्राप्तीची श्रेष्ठ संधी आहे. आपल्या घरी किंवा बुद्धविहारात सामूहिक ध्यान, धम्मदेशना आणि धम्मश्रवणाचे आयोजन करून नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही सहभागी करून घेणे हीदेखील धम्मसेवाच आहे.
बुद्धविहार ही समाजपरिवर्तनाची केंद्रे व्हावीत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारताना केवळ धर्मांतर केले नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दिली होती. त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे समतामूलक समाजरचनेचा पाया आहेत. मात्र आजही त्या प्रतिज्ञांचा आत्मा समाजजीवनात पूर्णपणे रुजलेला दिसत नाही. बुद्धविहारांची संख्या वाढली, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले; परंतु वैचारिक प्रबोधन आणि धम्माचरण यांना अपेक्षित गती मिळालेली नाही.
बुद्धविहार म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नव्हे. ते समाजाला दिशा देणारे वैचारिक विद्यापीठ आहे. तेथे समाजातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, युवकांना मार्गदर्शन मिळावे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग, महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम, व्यसनमुक्ती, वाचनसंस्कृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे कार्यक्रम राबविले जावेत. वर्षावास हा अशा परिवर्तनकारी उपक्रमांना प्रारंभ करण्याचा सर्वोत्तम काळ आहे.
उत्सवापेक्षा विचारांचा स्वीकार आवश्यक
आज अनेकदा आपण बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो; परंतु त्या मागील विचार जीवनात कितपत उतरवतो, हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. केवळ मिरवणुका, सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रम यापुरता उत्सव मर्यादित राहू नये. तो आत्मचिंतनाचा, समाजप्रबोधनाचा आणि धम्माचरणाचा उत्सव झाला पाहिजे.
भगवान बुद्धांनी “अत्त दीपो भव” म्हणजेच “स्वतःच स्वतःचा दीप बना” असा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शासनकर्ती जमात बना” असा विचार दिला. या दोन्ही संदेशांचा गाभा एकच आहे—ज्ञान, स्वाभिमान आणि संघटित प्रयत्नांद्वारे स्वतःचे आणि समाजाचे जीवन उन्नत करा.
वैचारिक एकतेची गरज
आज समाजात अनेक संघटना, गट आणि मतप्रवाह आहेत. वैचारिक मतभेद असू शकतात; परंतु धम्म, समता आणि मानवतेच्या मूलभूत तत्त्वांवर एकत्र येणे ही काळाची गरज आहे. बुद्धविहार राजकीय मतभेदांचे केंद्र न बनता सामाजिक ऐक्याचे आणि धम्मप्रसाराचे केंद्र व्हावेत.
वर्षावासाच्या निमित्ताने प्रत्येक बुद्धविहारात नियमित धम्मवर्ग, युवक मेळावे, महिलांसाठी प्रबोधन सत्रे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, वाचनालय, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि समाजोपयोगी उपक्रम सुरू झाले, तर बुद्धविहारांचे महत्त्व अनेकपटींनी वाढेल.
जगासाठी आदर्श ठरलेली परंपरा
श्रीलंका, थायलंड, म्यानमार, जपान आणि इतर अनेक बौद्ध देशांमध्ये बुद्धविहार ही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची केंद्रे आहेत. तेथे वर्षभर धम्मअध्ययन, समाजसेवा आणि नैतिक शिक्षणाचे कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे त्या समाजात शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांची जपणूक होताना दिसते.
भारतातही अशीच परिवर्तनाची चळवळ उभी राहण्यासाठी वर्षावास हा अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकतो. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या दोषांचे आत्मपरीक्षण करून चांगल्या गुणांचा स्वीकार केला, तर त्यातून कुटुंब बदलेल, समाज बदलेल आणि राष्ट्रही अधिक सुदृढ बनेल.
वर्षावासाची खरी साधना
वर्षावास हा केवळ धार्मिक विधी नसून आत्मविकास, समाजप्रबोधन आणि मानवकल्याणाचा प्रवास आहे. धम्माचे ज्ञान, करुणेची भावना, समतेचा विचार आणि प्रज्ञेचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचविण्याचे हे पर्व आहे. या काळात आपण आपल्या आचरणात शील, संयम, सदाचार, मैत्री आणि सेवाभाव रुजविण्याचा संकल्प करूया.
प्रत्येक बुद्धविहार ज्ञान, संस्कार आणि परिवर्तनाचे केंद्र बनला, प्रत्येक उपासक धम्माचरणात प्रामाणिक झाला आणि प्रत्येक कुटुंबाने बुद्ध, धम्म व संघ यांची मूल्ये जीवनात स्वीकारली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक समाजाचे स्वप्न निश्चितच साकार होईल.
वर्षावास हा केवळ भिक्खू संघाचा नाही, तर प्रत्येक धम्मानुयायाचा आध्यात्मिक आणि सामाजिक उत्सव आहे. या पवित्र पर्वात आत्मचिंतन, धम्मश्रवण, सेवा आणि समाजजागृती यांचा संकल्प करून बुद्धविहारांना परिवर्तनाची सशक्त केंद्रे बनविणे हीच आजची खरी गरज आहे.
सर्वांना वर्षावासाच्या आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक मंगल शुभेच्छा!
सर्वांचे मंगल होवो!
– आयु.सागर रामभाऊ तायडे
धम्म उपासक, धम्म अभ्यासक, प्रचारक. भांडुप, मुंबई.
मो.- 9920403859,







