बदलापूर पुन्हा हादरलं : शाळेच्या व्हॅनमध्येच ४ वर्षांच्या चिमुरडीवर चालकाचा लैंगिक अत्याचार

बदलापूर, दि. २३ : बदलापूर शहराला पुन्हा एकदा धक्का देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पश्चिम बदलापूरमधील एका खासगी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या व्हॅनमध्येच व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड केली, तर काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे खासगी स्कूल व्हॅनमधून घरी निघाली होती. मात्र, त्या वेळी व्हॅनमध्ये कोणतीही महिला मदतनीस उपस्थित नव्हती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी चालकाने व्हॅनमध्येच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दुपारी ठरलेल्या वेळेत मुलगी घरी न पोहोचल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली व शाळेशी संपर्क साधला. काही वेळाने मुलगी घरी आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. हा प्रकार ऐकून पालकांना मोठा धक्का बसला.

त्यानंतर पालकांनी तत्काळ बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपी चालकाला अटक केली असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “रात्री उशिरापर्यंत तपास करून गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,” अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

या घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिक, स्वयंसेवी कार्यकर्ते आणि काही राजकीय नेते पोलीस ठाण्यात दाखल झाले. शाळेच्या बस व व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विशेषतः महिला मदतनीसांची नियुक्ती, वाहनांची तपासणी आणि चालकांची पार्श्वभूमी पडताळणी याकडे शाळा व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, सुमारे दीड वर्षांपूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्या प्रकरणानंतरही बदलापूरकरांचा संताप उसळला होता. अशा घटना पुन्हा घडत असल्याने बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईसह शाळा व वाहतूक व्यवस्थेवर कडक नियंत्रण ठेवण्याची जोरदार मागणी होत आहे.

आणखी वाचा