…अनेक दरवाजे, नवा थरार! बिग बॉस मराठी 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

रितेश पुन्हा सूत्रसंचालन करणार? टीझरमुळे प्रेक्षकांत उत्सुकता ताणली .......टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय

मुंबई, दि. २५ : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. अख्ख्या महाराष्ट्राला ज्याची आतुरता असते, ज्याच्या आगमनाने मराठी मनोरंजन विश्वात नवचैतन्य येतं, तो शो आपला सहावा सीझन घेऊन लवकरच परतत आहे. शोच्या पर्वाचे संकेत लागताच सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या वेळेस बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार असून यंदाच्या सीझनमध्ये काय नवं असणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न घोळत आहेत. शोचा USP काय असेल? घराची यंदाची रचना कशी दिसेल? कोणते सेलिब्रिटी किंवा अनोळखी चेहरे यात सहभागी होणार? गेममध्ये कोणते ट्विस्ट असतील? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — या सिझनचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख करणार का? ‘भाऊचा कट्टा’ पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार का? या सर्व चर्चांना सध्या जोरदार उधाण आलं आहे.

कलर्स मराठीने जाहीर केलेला खास टीझर यंदाच्या सीझनचा सर्वात मोठा संकेत देतो — या वेळी एक नाही, तर अनेक दरवाजे दिसणार आहेत. या रहस्यमय दरवाजांमुळे सीझन 6 अधिक थरारक आणि रोमांचक असणार हे निश्चित मानलं जात आहे. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” अशा भावनेची ढवळाढवळ टीझर तयार करतो. बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रसारित होणार आहे.

या मल्टी-डोअर टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढली आहे. एका दाराऐवजी अनेक दरवाज्यांचा समावेश हा या सीझनचा मुख्य ट्विस्ट असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दारांमधून झिरपणारा प्रकाश, त्यांची नाविन्यपूर्ण रचना आणि त्या भोवतालचं रहस्यपूर्ण वातावरण हे सीझनविषयी अनेक कुतूहल निर्माण करतं.

सध्या शोबद्दलची बहुतेक माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र लवकरच स्पर्धकांची नावे, घराचा पहिला झलक, सीझनची थीम आणि धडाकेबाज ट्विस्ट यांचा उलगडा होणार आहे. एकूणच, मनोरंजनाचा बाप म्हणवल्या जाणाऱ्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांना आणखी एक धमाकेदार, भावनिक, विनोदी आणि तणावपूर्ण सफर घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याची वेळ जवळ आली आहे.

आणखी वाचा